नांदेड - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वंचित बहुजन आघाडी ही भाजपची 'बी' टीम आहे, असा आरोप काँग्रेसच्या जवळपास सर्वच नेत्यांनी केला होता. याबाबत त्यांनी आधी खुलासा करावा आणि माफी मागावी, तरच काँग्रेसशी आघाडी करण्याबाबत बोलणी करण्यात येईल, असे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला आहे. याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीचे संसदीय समितीचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी आज येथे दिली.
नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे संसदीय मंडळ नांदेडमध्ये आले आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अण्णाराव पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरू आहे. विदर्भात ९ जिल्ह्यांत आतापर्यंत ६१५ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
'वंचितला भाजपची 'बी' टीम म्हणणाऱ्या काँग्रेसने आधी माफी मागावी, मगच आघाडीचा विचार करू' प्रस्थापित राष्ट्रीय पक्षांचे सदस्यही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, असे सांगताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांच्या सदस्यांचाही यात समावेश आहे. नागपूरमधून समीर कुलकर्णी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकानेही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात आपण लढू इच्छितो, असेही त्याने सांगितले असल्याचे अण्णाराव म्हणाले.
नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघासाठी भोकर नगर परिषदेच्या एका काँग्रेस नगरसेवकाने अर्ज दाखल केला आहे, अशी माहितीही अण्णाराव यांनी दिली. यावेळी अशोक सोनोने, रेखाताई ठाकूर, प्रवक्ते फारुख अहमद आदी उपस्थित होते.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांना एक पत्र लिहिले. या पत्रात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी व्हावी, अशी आमची इच्छा आहे, असे लिहिले होते. त्यास, लोकसभा निवडणूक प्रचारात काँग्रेसच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडी भाजपची 'बी' टीम आहे, असा प्रचार केला होता. याबाबत एक तर पुरावा द्यावा किंवा बिनशर्त माफी मागावी. तरच आघाडीची बोलणी सुरू करू, असे उत्तर प्रकाश आंबेडकरांनी दिले आहे, मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रास अद्याप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलेले नाही, असे अण्णाराव यांनी म्हटले आहे.
एमआयएमच्या नेत्यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघात विशेष काम न केल्यामुळे मुस्लिमांची मते वंचित बहुजन आघाडीस मिळू शकली नाहीत, हे खरे आहे काय? असे विचारले असता अण्णाराव म्हणाले, तसे काही नाही. एमआयएमच्या नेत्यांनी खूप मेहनत घेतली. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी मतदारांना भाजपचे भय दाखवून विषारी प्रचार केल्याने मुस्लिमांची मते वंचितला मिळाली नाहीत.
नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतून एकूण ११० जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. उमेदवारीसाठी इच्छूक उमेदवार उच्चशिक्षित असला पाहिजे हा आमचा पहिला निकष आहे. वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी देताना जात, पात, धर्म, भाषा, प्रांत याचा कुठलाही भेद केलेला नाही. विशेष म्हणजे उमेदवारांची जात जाहीर करण्याचे धाडस फक्त वंचित बहुजन आघाडीने दाखविले आहे.
संसदीय समितीच्या सदस्या रेखाताई ठाकूर यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीस महिलांना ३० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण द्यायचे आहे. उमेदवार निवडताना याची शहानिशा आम्ही करणार आहोत. परंतु इच्छूकांमध्ये महिला उमेदवारांचे प्रमाण कमी असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.