नांदेड -प्रत्येक गोष्टीत प्लास्टिकचा अतिवापर होत असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. याला पर्याय म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र विषयाच्या पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांनी धान्यापासून खाण्यायोग्य प्लास्टिक निर्मितीचा म्हणजेच बॉयोप्लास्टिकचा शोध लावला आहे. विद्यापीठाने जे संशोधन केले आहे, त्याचे पेटंट केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याची माहिती कुलगुरू यांनी ईटिव्ही भारतला दिली
धान्याच्या पिठाचा कच्चामाल वापरुन बनवली पातळ फिल्मरसायनशास्त्र संकुलातील एमएस्सी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, गहू, सोयाबीन आणि तूरडाळ यासारख्या संपूर्ण धान्याच्या पिठाचा कच्चामाल म्हणून वापर करून पातळ फिल्मची निर्मिती केली आहे. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमातील संशोधन प्रकल्पाचा हा एक भाग आहे. या पातळ फिल्म्सचा वापर अन्नपदार्थाच्या पॅकिंगसाठी केला जातो. हरित अन्नपदार्थ पॅकिंग मटेरियल म्हणून त्याचा संभाव्य वापर अभ्यासला गेला आहे. रसायनशास्त्र संकुलातील प्रा. डॉ. ओमप्रकाश येमुल यांच्या मार्गदर्शनाखाली बहुलक रसायनशास्त्राच्या (पॉलिमर केमिस्ट्री) चे विद्यार्थी सोनिया खानसोळे, स्नेहा देशमुख, सुजाता जाधव, रितिका मणी, वैष्णवी ठोकळ, साक्षी काळे आणि बेग फिजा मिर्झा अमान यांनी या पॉलिफिल्म्सची निर्मिती केली आहे.
खाण्यायोग्य प्लास्टिक आरोग्यास हानिकारक नाहीप्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, त्याचप्रकारे उपयुक्त अशा प्लास्टिकचे काही तोटे सुद्धा आहेत. जीवाश्म इंधनापासून मिळणाऱ्या प्लास्टिकचा जैवविघटन कालावधी जास्त असतो. याशिवाय उत्पादनात हानिकारक रसायनाचा वापर हरितगृह वायू उत्सर्जन हे हवामान बदलासाठी जबाबदार मुख्य प्रदूषकांपैकी एक आहे. खाद्य किंवा खाण्यायोग्य प्लास्टिक हे आरोग्यास हानिकारक नसलेले आणि लहान प्राणी किंवा मनुष्याला सहज सेवन करता येऊ शकणारे पदार्थ असतात. ते पॉलिसॅक्राइडस, प्रथिने, लिपीडस, चरबी, कृषी कचरा इत्यादीपासून तयार केले जातात.