लोहा (नांदेड) : लोहा तालुक्यातील हळदव येथील 21 वर्षीय धोंडीबा केशव पवार हा मागील चार ते सहा महिन्यांपूर्वी डाक विभागाच्या परीक्षेत उतीर्ण होऊन गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्याअंतर्गत डाक कार्यालयात नोकरीवर रुजू झाला होता. अत्यंत हुशार व मनमिळाऊ असलेला धोंडीबा पवार याने इयत्ता दहावी परीक्षेत ९७ टक्के गुण संपादन करत यश मिळविले होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने धोंडीबा याने नोकरीसाठी जाहिरात निघाल्याने अर्ज करण्यास सुरुवात केली होती. मृतांमध्ये लोहा शहरानजीक हळदव येथील २१ वर्षीय तरुण डाक कर्मचाऱ्याचा समावेश आहे. सदरील घटना २८ जानेवारी रोजी सकाळी घडली.
अज्ञात वाहनाची जबर धडक :डाक विभागात विविध पदांसाठी जागा निघाल्यानंतर त्याने अर्ज करून परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्याने यश संपादन केले. डाक विभागातून निवड झाल्याचे आदेश आले तसे धोंडीबाच्या घरची मंडळी आनंदित झाली आणि पवार कुटुंबियांच्या अशा पल्लवित झाल्या. काही दिवसातच धोंडीबा हा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कम्मासुर डाक कार्यालयात प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून रुजू झाला. नोकरीस लागून चार ते सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला होता. गडचिरोली येथे डाक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण असल्याने २८ जानेवारी रोजी सकाळी अहेरी येथून काही डाक कर्मचारी गडचिरोलीकडे प्रशिक्षणसाठी पाच ते सहा मोटारसायकलीवरून एकामागे एक असे आलापल्ली ते मुलचेरा रस्त्याने जात असताना एका वळणावर धोंडीबा व रवी यांच्या मोटारसायकलीस अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.