नांदेड - जम्मू येथून नांदेडला आलेल्या दोन यात्रेकरूंना कोरोनाची बाधा झाल्याचे आज सकाळी समोर आले. नगिनाघाट परिसरातून गुरुवारी सायंकाळी काही यात्रेकरुंचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता त्यातील हे दोघे बाधित असल्याचे समोर आले आहे. यामुळे नांदेडमधील कोरोना बाधितांची संख्या आता 40 झाली असून यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, शुक्रवारी रविनगर कौठा येथे आढळलेला कोरोनाबाधित ट्रक चालक अनेक महिन्यापासून घरीच गेला नसल्याची माहिती मिळाल्याने तूर्तास त्या परिसराला कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला नसल्याची माहिती मिळत आहे.
होळी सणादरम्यान नांदेडमधील होला मोहल्ला उत्सवासाठी देशातील वेगवेगळ्या भागातून नांदेडमध्ये दाखल झाले. टप्याटप्प्याने हे यात्रेकरू नांदेडला दाखल होत असताना तिकडे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 मार्चपासून देशभरात टाळेबंदी सुरू झाली. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. दळणवळण ठप्प झाल्यामुळे सुमारे चार हजार यात्रेकरू नांदेडला अडकून पडले. काही दिवसांपूर्वी पंजाब राज्यातील यात्रेकरू शासनाच्या परवानगीने त्यांच्या गावी पोहचले असले तरी इतर बऱ्याच राज्यातील यात्रेकरु अजूनही नांदेडात अडकून आहेत.
दरम्यान, नांदेडला अडकलेल्या यात्रेकरूंची स्क्रिनिंगद्वारे वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. पण, येथून पंजाबला गेल्यानंतर बरेच प्रवासी कोरोनाग्रस्त आढळल्याने नांदेडला त्यांच्या संपर्कात आलेल्या तसेच येथे थांबलेल्या यात्रेकरू व इतर व्यक्तींचे स्वॅब घेणे सुरू आहे. नगिनाघाट व आसपासच्या परिसरातून आतापर्यंत शंभरहून अधिक व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहे. या परिसरात थांबलेले जवळपास 30 जण आतापर्यंत कोरोना संक्रमित झाल्याचे आढळले. त्यामुळे प्रशासनाकडून या परिसरात बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वॅब घेण्यात येत आहे.