नांदेड -पारंपरिक हल्लाबोल मिरवणुकीला मोठा प्रतिसाद मिळाला. मिरवणुकीत वेगवेगळ्या दलाच्या तरुणांनी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी नांदेडकरांचे लक्ष वेधले. दसऱ्याच्या मुहूर्तावर नांदेड येथील सचखंड श्री हुजुर साहिब येथे पारंपरिक दसरा महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवासाठी भारताच्या वेगवेगळ्या भागातून विशेषतः पंजाब, हरियाणा राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात.
नांदेड मध्ये बोले सो निहालच्या गजरात दसरा महल्ला - नांदेडमधील दसरा
पांरपारिक हल्लाबोल मिरवणुकीतला नांदेडमध्ये मोंठा प्रतिसाद मिळाला. हुजुर साहिब येथे पारंपारिक दसरा महोत्सव साजरा झाला.
दोन दिवसांपूर्वी बाबा विधीचंदजी दल, तरणा दल, शिरोमणी पंथ, अकाली बुढा दलासह सहा दलांचे नांदेडमध्ये या कार्यक्रमासाठी आगमन झाले होते. सकाळी गुरुद्वारात श्री दसमसाहिब अंतर्गत श्री चंडीपाठाचे पठण व समापन करण्यात आले. यावेळी गाभाऱ्यातील ऐतिहासिक शस्त्रांची विधीवत पूजा करण्यात आली. सायंकाळी चार वाजता गुरुद्वारा परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गुरुद्वारा चौक, महावीर चौक येथे मिरवणूक आल्यानंतर परंपरेनुसार प्रतिकात्मक हल्ला करण्यात आला.
मिरवणुकीत निशानसाहिब, कीर्तनकार जत्थे, भजनी मंडळी, बँड पथक, घोडे यांचा समावेश होता. वेगवेगळ्या दलातील तरुणांनी केलेल्या चित्तथरारक कवायतींनी नांदेडकरांचे लक्ष वेधले. हल्ला महल्लाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता. जुना मोंढा ते महावीर चौक या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात आली होती. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्यासह अंतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, पोलिस उपाधीक्षक अभिजीत फस्के, धनंजय पाटील आदी अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून होते.