महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सिद्धेश्वरमधून गुरुवारी विष्णुपुरी धरणात पाणी येणार; मोटार लावून पाणी खेचणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार' - सिद्धेश्वर धरण'

नांदेड शहराचा विशेषतः दक्षिण भागाचा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. त्यामुळे मनपाच्या यंत्रणेविषयी समाजमाध्यमांवर रोष व्यक्त झाला होता. त्याची दखल घेत मनपा आयुक्त लहुराज माळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खंबीर उपाय योजण्याचे आदेश दिले.

विष्णुपुरी धरण

By

Published : Jun 13, 2019, 1:24 PM IST

Updated : Jun 13, 2019, 2:23 PM IST

नांदेड- नांदेडकरांसाठी सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी विविध मार्गाने नांदेडच्या विष्णुपुरी धरणात गुरुवारी सायंकाळपर्यंत पोहोचणार आहे. या मार्गावर मोटार लावून पाणी खेचणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा मनपाचे आयुक्त लहुराज माळी यांनी दिला आहे.

सिद्धेश्वरमधून गुरुवारी विष्णुपुरी धरणात पाणी येणार

नांदेड शहराचा विशेषतः दक्षिण भागाचा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. त्यामुळे मनपाच्या यंत्रणेविषयी समाजमाध्यमांवर रोष व्यक्त झाला होता. त्याची दखल घेत मनपा आयुक्त लहुराज माळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खंबीर उपाय योजण्याचे आदेश दिले. तसेच पत्रकारांशीही या मुद्यावर चर्चा करून संभाव्य उपायाबाबत सूचना घेतल्या. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता 'सुग्रीव अधारे, उपायुक्त विलास भोसीकर, टँकर विभागाचे गिरीश कदम, हातपंप व वीज मोटारी विभागाचे प्रमुख सुनील देशमुख उपस्थित होते.

नांदेड शहराला दररोज ९० एमसीडी एवढे पाणी लागते. शहरात एकूण ३९ जलकुंभ असून त्यापैकी ३६ जलकुंभामध्ये पाणीसाठा केला जातो. गत २-३ वर्षांपासून नांदेड शहरातही तीव्र पाणी टंचाईची समस्या वाढली आहे. त्यामुळे मनपा उर्ध्व पैनगंगा इसापूर व विष्णुपुरी धरणातून पाणी विकत घेऊन तहान भागवत आहे. मात्र, यंदा तीव्र उन्हाळ्यामुळे शहरात विशेषतः दक्षिण नांदेड भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे, असे आयुक्त माळी म्हणाले.

विष्णुपुरी धरणातील पाणी यंदाही मृत साठ्यावर गेल्यामुळे पाणी उपसा करणे, मनपाच्या विहिरीत भरणे त्यानंतर पुरवठा करणे अशी कामे दररोज करावी लागतात. त्यामध्ये महावितरण कंपनीच्या तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठयात अडथळा, विस्कळीतपणा निर्माण झाला आहे. मनपाकडून सध्या ५ दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, जूनमध्ये त्यातही विलंब झाला असल्याचे आयुक्तांनी मान्य केले. पाच दिवसांऐवजी आठ, दहा दिवसांनी पाणी पुरवठा केला गेला.

मनपाने शहरासाठी विष्णुपुरीतून ३० दलघमी पाणी विकत घेण्याची तयारी केली. मात्र, जलसंपदा विभागाने आतापर्यंत २८ दलघमीच पाणी पुरवले आहे. विष्णुपुरीतील मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागत असल्याने पालकमंत्र्यांनी सिध्देश्वर धरणातून १४ दलघमी पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पाणी सोडले असून गुरुवारी सायंकाळपर्यंत विष्णुपुरीत येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

पाणी आल्यावर महिना-दीड महिन्याची पाण्याची चिंता मिटेल. तोपर्यंत एक दोन दमदार पाऊस होण्याची अपेक्षा आहे. सिध्देश्वर धरणातून सोडलेले पाणी विष्णुपुरीमध्ये येईपर्यंतच्या मार्गावर अवैध मोटारी लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही माळी यांनी यावेळी दिला. तसेच शहरातील काही भागात नगरसेवक व त्यांचे प्रतिनिधी पाणी टँकर व पाणी सोडणाऱ्या व्यक्तीवर दबाव टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, त्याचीही गय करू नका, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

Last Updated : Jun 13, 2019, 2:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details