नांदेड- अबचलनगर येथे सुरुवातीला आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या निकटवर्तीयांतील तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली. यापैकी एक महिला व दोन पुरुष असून त्यांचे वय ३५ ते ३८ च्या दरम्यान आहे. या नव्या बाधित व्यक्तींमध्ये रविनगर येथील एक जण असल्याने कोरोनाने शहरातील इतर भागातही पाय पसरवणे सुरू केल्याचे दिसून येत आहे.
पहिल्यांदा या तिघांचेही अहवाल नकारात्मक आले होते. पण कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दुसऱ्यांदा त्यांचे स्वॅब घेतला असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दुसरीकडे कोरोना आता कौठा भागातील रविनगरमध्येही पोहचला आहे. या वस्तीतील एक तरुणही कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. यामुळे कौठा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा परिसर सील करून सहावा कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित केला जाणार आहे.
निगेटिव्ह पहिल्यांदाच झाले पॉझिटिव्ह -
आज आढळलेले तिघेही रुग्ण पंजाब येथून परतलेल्या अबचलनगरमधील चालकाच्या निकट संपर्कातील होते. त्यांचे स्वॅब पूर्वी घेतले असताना ते निगेटिव्ह होते. पण दुसऱ्यांदा स्वॅब घेतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण असल्याचे आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे अहवाल पूर्वी जरी निगेटिव्ह आले असले तरी दुसऱ्या चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ही बाब गंभीर असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे आज पॉझिटिव्ह आलेले व्यक्ती कुठे क्वांरटाईन होते की ते त्यांच्या घरी होते हे मात्र समजू शकले नाही.