नांदेड- राज्य सरकारच्या शिफारसीवरून केंद्र सरकार काही मोजक्या पिकांना हमीभाव जाहीर करते. हळद हे भारतीयांचं पीक म्हणून जगात प्रसिद्ध असताना व टिकाऊ उत्पादन असूनही हळद पिकाला सरकार हमीभाव जाहीर करत नाही. हळदीला हमीभाव मिळणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून राज्य व केंद्र सरकारने हमीभावाच्या यादीत हळदीचा समावेश करून १० हजार हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडे केली आहे.
मराठवाड्यात हळदीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असून नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्याचे तर मुख्य पीक बनत आहे. केळी व ऊसापेक्षा कमी पाण्यात, कमी दिवसात येणारे नगदी पीक असल्याने शेतकरी हळदीकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. परंतु हळदीला सरकारचा हमीभाव नसल्याने अनेक वेळा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. कधी पंधरा-वीस हजार रुपये क्विंटल तर कधी तीन चार हजार रुपये क्विंटल होत असल्याने या पिकाच्या दराबाबत शेतकरी नेहमी चिंताग्रस्त असतो.