नांदेड : भारत राष्ट्र समितीकडून सीमावर्ती भागातील गावांमध्ये भेटीगाठीचे सत्र अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री केसीआर यांनी देशभर आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जानेवारीतच नांदेडमध्ये सभा होणार होती. परंतु शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे सभा पुढे ढकलावी लागली होती. त्यानंतर ५ फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून बीआरएसच्या अनेक नेत्यांनी या सभेसाठी भरपूर मेहनत घेतली आहे.
२० हजार लोकांची आसन व्यवस्था :या सभेच्या तयारीसाठी पंधरा दिवसांपासून तेलंगणाचे मंत्री, खासदार आमदार हे नांदेडमध्ये तळ ठोकून होते. हिंगोली गेट येथील मैदानावर जवळपास २० हजार लोकांना बसता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याच सभेत जिल्ह्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याशिवाय याच सभेला मनसेकडून विरोध करण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पाळेमुळे रोवण्यास सुरुवात : तेलंगणातील भारत राष्ट्र समिती या पक्षाने आता महाराष्ट्राच्या राजकारणात आपली पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली आहे. याचीच सुरुवात म्हणून, 5 फेब्रुवारी रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची नांदेडमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सीमावर्ती भागातील विविध प्रश्न आमि पाणी प्रश्नावर महाराष्ट्रातील नेत्यांना दोषी ठरवत बीआरएस पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात श्रीगणेश करणार असल्याची चर्चा आहे. तर महाराष्ट्रातील सीमा भागांतील मराठी माणसांच्या समस्यांसाठी नांदेड जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांना बीआरएसकडून दोषी ठरवण्यात येत आहे. या गावातील प्रश्न समोर ठेवून ही सभा होणार आहे. ज्यात धर्माबादजवळील बाभळीच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे. पण आता याच सभेला मनसेकडून विरोध करण्यात येत आहे.