नांदेड - जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील रावसाहेब देशमुख नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड डेफनेस संचलित, मिनाक्षी देशमुख गर्ल्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये गेल्या 22 वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत आसलेल्या शिक्षकाला हक्काच्या वेतनासाठी वणवण भटकंती करावे लागत आहे. वेतन आणि पगाराविना आर्थिक अडचणीत दिवस काढले. अखेर कंटाळलेल्या शिक्षकाने वेतन आणि अनामत रक्कम परत मिळावी या मागणीसाठी आपला संसार चक्क शाळेतच थाटला आहे. त्यांनी संसार उपयोगी साहित्य आणि मुलांसोबत आपले बिऱ्हाड शाळेतच थाटले आहे.
आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विविध मार्गाने आंदोलन, उपोषण, निवेदन, आदी मार्गाने आंदोलन करण्यात येते. कधी गांधीगिरी करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येते. ज्या शाळेत अध्यापनाचे काम केले त्याच शाळेत वेतनासाठी शिक्षकाला संसार थाटवा लागला आहे. सदरील पीडित शिक्षक आपल्या मुलासह गांधीगिरी करून सोमवारी (5 ऑक्टोबर) सायंकाळपासून आंदोलन करित आहेत. या अनोख्या आंदोलनाने जिल्ह्याचे लक्ष वेधले.
नांदेड येथील माजी आमदार डी. आर. देशमुख यांचे अर्धापूर शहरांत गेल्या तीन दशकांपासून मीनाक्षी देशमुख गर्ल्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कार्यरत आहे. या शाळेत २२ वर्षांपुर्वी भास्कर लोखंडे हे इंग्रजीचे विषयासाठी शिक्षक म्हणून रूजू झाले आहेत. शाळा अनुदानित झाल्यावर पूर्ण वेतन मिळेल. या आशेवर अध्यापनाचे काम नेटाने करित आहेत. तसेच कुटुंबाला अर्थिक आधार मिळावा यासाठी खासगी शिकवण्या घेऊन दिवस काढली. तसेच वेतनाची धास्ती घेत त्यांच्या पत्नीचाही दुर्धर आजाराने मृत्यू झाला.
गेल्या सहा महिन्यांपासून ताळेबंद असल्यामुळे खासगी शिकवण्या बंद झाल्या आहेत. घरखर्च आणि मुलांचे शिक्षण आदी खर्च भागत नाही. वेतनही नाही. अशी बिकट परिस्थिती उद्भविल्याने वेतन मिळावे, यासाठी पीडित शिक्षकाने आपला संसार चक्क शाळेतीलच एक वर्गाच्या खोलीत थाटला आहे. यात संसार उपयोगी साहित्य, पंखा, गॅस, धान्य, आदी. रोज लागणाऱ्या वस्तू आहेत.
- आर्थिक अडचणीमुळे पत्नीच्या आजाराला खर्च करू न शकल्याची खंत -