नांदेड- धर्माबाद येथील नगरपरिषदेतील तत्कालीन कर अधीक्षक आणि सफाई कामगाराने संगनमताने १० लाख ५८ हजार ४९ रुपयांचा अपहार केल्यामुळे न्यायाधीश एन.आर. गजभिये यांनी ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नगरपरिषदेतील तत्कालीन कर अधीक्षक पठाण अफजलखान नवाजखान आणि सफाई कामगार मनोज हरीसिंग टाक यांनी संगनमत करुन जागेचे भाडे, इमारत भाडे आणि सेवा शुल्क नागरिकांकडून वसुल करुन सदर रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्याऐवजी परस्पर हडप केली.
सदर प्रकरणाची माहिती मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना कळताच त्यांनी लेखापरीक्षण करून घेतले. त्यात दोघेजण दोषी आढळले. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक रुकमाजी भोगावार यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दोघाजणांवर येथील पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आला.
सदर अपहार प्रकरण मोठे आहे. यामध्ये अनेक मोठी नावे अडकण्याची शक्यता तपास अधिकारी तथा उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरकंडे वर्तविली आहे. तसेच तत्कालीन कर अधीक्षक पठाण अफजलखान नवाजखान यांनी अनेकांकडून गाळे भाडे वसूल केले आहे. परंतु, सदर व्यापाऱयांना नगरपरिषदेची पोचपावती दिली नसल्याची चर्चा शहरातील व्यापारी करत आहेत.