नांदेड -कोरेगाव-भीमा प्रकरणातील कागदपत्रे देण्यास पुणे पोलिसांनी नकार दिल्यानंतर, एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) आता न्यायालयात धाव घेतली आहे. यावरुन संबंधीत प्रकरणातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न राज्यसरकार करत असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यांनी नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधला.
एनआयएला कागदपत्रे देण्यास पुणे पोलिसांनी नकार दिल्यानंतर याप्रकरणी मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. चार्जशीट तयार होत आल्यानंतर कुणाला वाचवण्यासाठी हा प्रकार चालू आहे, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे.
याआधी कोरेगाव-भीमा प्रकरणात फडणवीस सरकारकडून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला होता. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, जर फडवणीस सरकारने कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल तर खेचून बाहेर काढा, नुसत्या घोषणा करण्यात काही अर्थ नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.