नांदेड- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूची साथ पसरली असून हदगावमध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हिमायतनगर तालुक्यातही दोन जणांचा बळी गेला आहे. या घटना ताज्या असतानाच देगलूर तालुक्यातील सोमूर येथील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पुरुषोत्तम अशोक बिरादार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
नांदेडमध्ये डेंग्यूचे थैमान; 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू - नांदेडमध्ये डेंग्यूचा बळी
देगलूर तालुक्यातील सोमूर येथील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पुरुषोत्तम अशोक बिरादार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर नोव्हेंबरमध्ये विषम वातावरण, स्थानिक पातळीवरील अस्वच्छता आणि डासांची वाढती उत्पत्ती यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. डेंग्यूच्या रुग्णांनी नांदेडच नाही तर विविध तालुक्याच्या ठिकाणांची खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी आहे. हदगाव तालुक्यात गेल्याच आठवड्यात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर हिमायतनगर तालुक्यातही दोघांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आता देगलूर शहरातील श्रीराम टेक्स्टाईल्स कापड दुकानाचे व्यापारी आणि मुळ सोमूरचे रहिवाशी अशोक पाटील बिरादार सोमूरकर यांचा मुलगा पुरुषोत्तम अशोक बिरादार (वय १५) याचे डेंग्यूमुळे रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हेही वाचा -भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
पुरुषोत्तमला ताप येत असल्याने १७ नोव्हेंबरला देगलूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला नांदेड येथून हैदराबाद येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, शहरासह देगलूरच्या ग्रामीण भागातही डेंग्यूने थैमान घातले असून सर्दी, ताप व पांढऱ्या पेशी कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढली आहे. शहर पातळीवर पालिका प्रशासन आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून धूर फवारणी करुन डासांची उत्पत्ती रोखावी, अशी मागणी केली जात आहे.