नांदेड -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत मोकाट जनावरांचा होणारा अडथळा टाळण्यासाठी महापालिकेने तीन दिवस विशेष मोहिम राबविली. यात ४३ मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात टाकण्यात आली. मात्र, ही यात्रा नांदेडमधून पुढच्या ठिकाणी मार्गस्थ झाल्यानंतर मोकाट जनावरांची यात्रा पुन्हा एकदा रस्त्यावर सुरू झाली आहे. तुर्तास एक वाहन व दहा कामगारांमार्फत जनावरे पकडण्याची मोहीम दोन महिने सुरू ठेवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मोकाट जनावरांना रस्त्यावर मुक्तपणे संचार करता आला नाही. ज्या जनावरांच्या मालकांनी त्यांना रस्त्यावर सोडले, अशा ४३ जनावरांना महापालिकेच्या कंत्राटी मजुरांनी पकडून वाहनात बसवून कोंडवाड्यात बंदीस्त केले. एका वाहनात केवळ दोन ते तीन जनावरे बसत असल्याने ही मोहीम सुरू ठेवताना कामगारांना मर्यादा आल्या. २७ ऑगस्टला सर्वाधिक २२ जनावरे पकडल्यानंतर उर्वरीत जनावरांच्या मालकांनी रात्री मोकाट सोडण्याचे टाळले. त्यामुळे २८, ११ आणि २९ ऑगस्टला १० जनावरे पकडण्यात आली.
महाजनादेश यात्रेच्या दिवशी गोकुळ नगर भागातील आठवडीबाजार व्हीआयपी रोडवर बसू नये, यासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर होती. पोलीस पथकानेही त्यांना मदत केली. त्यामळे शुक्रवारचा बाजार इंदिरा गांधी मैदान तसेच महादेव डाळ मिल ते विष्णुनगर रस्त्यावर भरविण्यात आला. मोकाट जनावरे पकडणारी यंत्रणाही रस्त्यावर थांबल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या यात्रेत कोठेही अडथळा आला नाही.
हेही वाचा - एक लाख रुपयांसाठी सासरच्यांनी मारहाण केल्याने विवाहितेचा गर्भपात; गुन्हा दाखल