नांदेड - शेतकरी आपल्या शेतात विविध पिकांचे उत्पादन घेतो. पण, शेतीमाल प्रक्रिया आणि विक्रीसाठी कमी पडतो. पण, मालेगाव (ता. अर्धापूर) येथील युवा शेतकरी भगवान इंगोले यांनी या सर्व बाबींवर मात करत सेंद्रिय शेतीचे स्वतः उत्पादन घेत त्या शेतमालाचे उत्पादन, प्रक्रिया व विपणन या त्रिसूत्रीचा वापर केला असून या शेतीमालाला परराज्यातही मोठी मागणी होत आहे.
रासायनिक खतांचा वापर न करता स्वतःच तयार केली सेंद्रिय व जैविक खते
अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील युवा शेतकरी भगवान इंगोले हे मागील चार वर्षांपासून रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत. विशेषतः भगवान इंगोले यांनी आपल्या शेतात शेती लागवडीसाठी लागणारी खते, फवारणी स्वतः तयार करतात. यामध्ये जैविक निविष्ठाची निर्मिती व कीडनाशक औषधे बनवतात. सेंद्रिय शेतीमध्ये त्यांनी हळद, ऊस या सर्व प्रकारचे कडधान्य ते सेंद्रिय पद्धतीने उत्पादित करतात.
शेतकरी गटाची केली स्थापना
मालेगाव येथे त्यांनी ओम शांती या शेतकरी गटाची स्थापना केली आहे . या गटात 34 शेतकरी असून 50 एकर शेतीमध्ये सेंद्रिय शेती केली जाते आहे. भगवान इंगोले यांनी शेतीमाल विक्रीसाठी इतर बाजारपेठेवर अवलंबून न राहता स्वतःच्या शेतात उत्पादित केलेल्या शेतीमालाची उत्पादन प्रक्रिया व विपणनही केली आहे.