नांदेड -मागील पंधरा दिवसात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मंगळवारी (६ नोव्हेंबर) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आजही शेतात गुडघाभर पाणी असून, पिकावर बुरशी चढली आहे. या भयावह परिस्थितीत शेतकरी हैराण झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नांदेडला येत आहेत.
मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते लोहा तालुक्याकडे रवाना होणार आहेत. या तालुक्यातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष शेतात जावून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. झालेल्या नुकसानीबाबतचा आढावा ते यावेळी घेणार आहेत. त्यानंतर ते कंधार तालुक्यात जातील आणि तेथील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून चर्चा करतील. लोहा-कंधार नंतर ते अहमदपूरकडे रवाना होतील.
३ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्ह्यातील एकुण २० गावांना भेटी देवून शेतीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. येत्या ५ दिवसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नांदेड येत असल्याने सर्व शिवसैनिकांनी नांदेड विमानतळावर मंगळवारी सकाळी १० वाजता जमावे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव पाटील बोंढारकर, उमेश मुंडे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.