५६ इंचाची छाती असलेल्या सरकारच्या काळातच देशावर जास्त हल्ले - शरद पवार - fadnavis
हे सरकार देशाचे संरक्षण करण्यास अपयशी ठरले आहे. पुलवामा हल्ल्यामुळे देशावर संकट आले आहे. मात्र, यासाठी बोलवण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत स्वत: पंतप्रधान गैरहजर होते. हे सरकार फक्त ५६ इंचाच्या छातीच्या गप्पा मारतं. दहशतवाद संपवण्यात भाजप सरकार अपयशी ठरले असल्याची शरद पवारांची टीका
नांदेड - पुलवामा हल्ल्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार देशाचे संरक्षण करण्यास अपयशी ठरले आहे. पुलवामा हल्ल्यामुळे देशावर संकट आले आहे. मात्र, यासाठी बोलवण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत स्वत: पंतप्रधान गैरहजर होते. हे सरकार फक्त ५६ इंचाच्या छातीच्या गप्पा मारतं. दहशतवाद संपवण्यात भाजप सरकार अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
पुलवामा हल्ल्यात जवान शहीद झाले असताना मोदी यवतमाळमध्ये प्रचारसभेला गेले होते. यांच्या सरकारमध्ये झालेल्या हल्ल्याची संख्या पाहिली असता, प्रतिवर्षी २०१४ मध्ये- ३४२, २०१५ मध्ये ५८७ , २०१६ मध्ये ७०० हल्ले अशी आकडेवारी समोर येते. मात्र, एवढे हल्ले देशात होत असताना हे सरकार ५६ इंचाच्या छातीच्या गप्पा मारत होते. हे सरकार संरक्षणात कमी पडली असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
मनमोहन सिंहांच्या काळात एक हल्ला झाला होता. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असणारे मोदी यांनी एका भाषणात मनमोहनसिंगाना उद्देशून पाकिस्तानला काय पत्र लिहता, आमची सत्ता आल्यावर आपला एक माणूस मारला तर आम्ही त्यांच्या चार जणांची हत्या करू असे म्हणाले होते. मात्र, आज आपले शेकडो सैन्य मारले जात आहेत. हे दुबळे सरकार देशाची सुरक्षा करू शकत नाहीत. गेल्या साडेचार वर्षात काय केले? नोटबंदीमुळे कोट्यवधीचे नुकसान झाले. नोटबंदी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटवर आले होते. त्यावेळी त्यांनी या नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल, दहशतवादाला आळा बसेल असे सांगितले होते. मात्र, त्या नोटबंदीने मोठ्यांचे नुकसान झाले नाही, तर गरिबांचे जीवन उद्धवस्त झाले असल्याची टीका पवारांनी यावेळी केली.
जीएसटीने तर देशातील व्यापारी वर्गाला देशोधडीला लावले असल्याचेही मत यावेळी पवारांनी व्यक्त केले. कर्ज माफीचा विचार केला तर तिही फसवी होती. मी कृषी मंत्री असताना यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही त्या शेतकऱ्यांच्या घरी भेट दिली आणि ती परिस्थिती पाहून त्यांचे वास्तव ऐकून आम्ही दिल्लीला गेलो. त्यानंतर ८ दिवसात ७१ हजार कोटींचे सरसकट कर्ज माफीचा निर्णय घेतला. या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले. हा उतारा द्या , तो कागद द्या असे नियम लावले असल्याची टीकाही पवारांनी यावेळी केली.