नांदेड- भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य व नायगाव विधानसभेचे इच्छुक उमेदवार राजेश पवार यांच्या सुरक्षा रक्षकाकडून दिगंबर शंकरराव खपाटे या शेतकऱ्यास धक्काबुक्की करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकाराबद्दल दोन जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विधानसभेच्या इच्छुक उमेदवाराच्या सुरक्षा रक्षकाकडून शेतकऱ्याला धक्काबुक्की
पीक कर्ज व कर्जमाफीची माहिती विचारल्याबद्दल, नांदेडच्या नायगाव विधानसभेचे इच्छुक उमेदवार राजेश पवार यांच्या सुरक्षा रक्षकाकडून एका शेतकऱ्याला धक्काबुक्की व मारहान केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
बँकांमध्ये शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारीनंतर राजेश पवार यांनी सोमवारी तालुक्यातील बँकांना भेटी देत, माहिती घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी बन्नाळी येथील शेतकरी तथा शिवा संघटनेचे कार्यकर्ते दिगंबर शंकरराव खराटे यांनी राजेश पवार यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राजेश पवार यांनी 'मला विचारू नकोस, नरेंद्र मोदी यांना विचार' असे सांगितले. यावर हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही, असे दिगंबर खपाटे यांनी म्हणताच राजेश पवार यांच्या सुरक्षा रक्षकासह समर्थकांनी खपाटे यांना धक्काबुक्की करून बँकेच्या बाहेर काढून टाकले. या घटनेनंतर शिवा संघटनेने या प्रकाराचा निषेध केला होता. शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी आरोपींवर कारवाई न झाल्यास पोलिस प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर पोलीसांनी बाजार समितीचे संचालक अशोक वडजे व नागेश कहाळेकर यांच्यावर एन. सी. दाखल केली आहे. दरम्यान या घटनेनंतर आता राजेश पवार यांच्यावर पक्षाकडून नेमकी काय कारवाई केली जाईल, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.