महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडात शालेय विद्यार्थ्यांची पावसासाठी पांडुरंगाकडे प्रार्थना - warkari

नांदेड जिल्ह्याकडे पाठ फिरवेलेल्या वरूणराजाने मनसोक्त बरसावे यासाठी विद्यार्थ्यांनी पांडुरंगाकडे आगळ्यावेगळ्या पद्धतीने गाऱ्हाणे मांडले

प्रार्थना करताना शालेय विद्यार्थी

By

Published : Jul 14, 2019, 4:40 PM IST

नांदेड- जिल्ह्याकडे पाठ फिरवेलेल्या वरूणराजाने मनसोक्त बरसावे यासाठी विद्यार्थ्यांनी पांडुरंगाकडे आगळ्यावेगळ्या पद्धतीने गाऱ्हाणे मांडले. स्वामी विवेकानंद स्कुल ऑफ स्कॉलर्स आणि रविशंकर बाल मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी नमस्कार चौक, एमजीएम कॉलेज, बसवेश्वर नगर या भागातून आषाढी निमित्त टाळ, मृदंगाच्या गजरात दिंडी काढून वृक्ष लागवड, पाणी हे जीवन आहे, पर्यावरणाचे जतन याबाबत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.

प्रार्थना करताना शालेय विद्यार्थी

मरळक येथील वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प. शिवाजी इंगोले महाराज यांच्या विद्यार्थ्यांनीही यावेळी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या लेझीम, टाळ आणि मृदंगाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.


जुलैचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. मात्र, अजूनही पावसाने नांदेडकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. अबालवृद्धासह प्राणी, पशु, पक्षी चातकाप्रमाणे पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकरी हवालदिल आहे. ज्या काही लोकांनी पेरण्या केल्या त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट तर ज्यांनी पेरण्या केल्या नाही. त्यांच्या हातातून यावर्षीचा खरीप गेल्याचे चित्र आहे.


पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आताच एवढा उग्र झाला आहे, की भविष्यात आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे. या चिंतेनेच नांदेडकर ग्रासले आहेत. एकीकडे महाराष्ट्रातील आणि देशातील काही भागात धुमाकूळ घालणारा पाऊस नांदेडवर एवढा नाराज का असा प्रश्न नांदेडकरांना पडला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली असून विहीर आणि बोअर कोरडे पडले आहेत. रोज ढग दाटून येतात, मात्र पाऊस पडत नाही. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हेच गाऱ्हाणे पांडुरंगाकडे मांडून अभंग, आणि भावंगीतांच्या माध्यमातून वरूणराजने कृपादृष्टी ठेवावी, असे आवाहन केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल पांडे, सर्व शिक्षक आणि पालकांची ही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

माऊली माऊलीच्या जयघोषाने परिसर दुमदुमला....

जय हरी विठ्ठल, माऊली माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. सुरुवातीला वरूण राजाची कृपादृष्टी नांदेडवर व्हावी. यासाठी, सामूहिक प्रार्थना करण्यात आली. लहान मुलांचे टाळ, मृदंग आणि लेझीम पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. तर दिंडीचा समारोप पसायदानाने झाला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details