इस्लापूर : किनवट तालुक्यातील इस्लापूर भागात एप्रिल, मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने चक्क सहस्त्रकुंडचा धबधबा वाहत आहे. भर उन्हाळ्यात धबधबा ओसंडून वाहण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. मागील वीस-बावीस दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कधी गारपीट, तर कधी वादळीवारे, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी नैसर्गिक संकटाने हतबल झाला आहेत.
सहस्त्रकुंड धबधबा : या पावसाने नदी, वनतळे, शेततळे, नाले, वाहू लागले असून, सहस्त्रकुंड, धबधबा सुरू झाला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने व सध्या पावसाळी. वातावरण असल्याने, सहस्त्रकुंडचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी वाढली आहे. सहस्त्रकुंड धबधबा हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधब्यापैकी एक आहे. पावसाळ्यात अनेक निसर्गप्रेमी भेट देण्यासाठी या धबधब्याला भट देण्यासाठी येत असतात. हा धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात लाखो लोक गर्दी करतात.
सर्वात मोठा धबधबा :सहस्त्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. या धबधब्याचा काही भाग यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात येतो, तर काही भाग नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात येतो. सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवर आहे, जी मराठवाडा आणि विदर्भाला विभाजित करते. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटकांसोबतच हा धबधबा महाराष्ट्रभरातील पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. नदीचा प्रवाह एका मोठ्या खडकाने विभागला जातो ज्यामुळे पाणी दोन वेगळ्या प्रवाहांमध्ये येते. नदीच्या अलीकडील प्रवाहातील हा सर्वात मोठा धबधबा आहे.