नांदेड - कोरोनामुळे मागील ८ महिन्यांपासून बंद असलेली प्रार्थनास्थळे आजपासून (सोमवार) उघडण्यास सरकारने मंजुरी दिली. सरकारच्या या निर्णयाचे नांदेडमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. नांदेडमध्ये जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा येथे देश-विदेशातील भाविक दर्शनासाठी येत असतात. आज गुरुद्वारा परिसर गर्दीने फुलून गेला असून भाविक व व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आठ महिन्यांपासूनगुरुद्वारा होता बंद -
शीख धर्माची दक्षिणकाशी म्हणून ओळख असलेल्या नांदेड सचखंड गुरुद्वारा येथे देश-विदेशातील भाविकांची मोठी गर्दी असते. गेल्या आठ महिन्यांपासून गुरुद्वारात दर्शन बंद होते. भाविकही नसल्यामुळे येथील व्यापारही ठप्प होता. येथील व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, आजपासून भक्तांसाठी गुरुद्वारा परिसर खुला होणार आहे. त्यामुळे सध्या गुरुद्वारा परिसरात मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे.
सात महिन्यांपासून गुरुद्वारा देत आहे सेवा -
लॉकडाऊन काळात गुरुद्वारा बोर्डाने दररोज लाखो गोरगरीब वस्तीत व अडकून पडलेल्या प्रवाशांना जेवण दिले. तसेच गुरुद्वारा बोर्डाचे एनआरआय भवन गेल्या सात महिन्यापासून कोविड सेंटर म्हणून सेवा देत आहे. उत्तम स्वच्छता आणि सकस आहार रुग्णांना मिळत असल्यामुळे येथे अॅडमिट होण्यासाठी रुग्णांची मागणी असते. एकप्रकारे संपूर्ण जिल्ह्यात सर्वात मोठी व चांगली सेवा देऊन गुरुद्वाराने माणुसकीचे नाते जपले.
जिल्हाप्रशासनाच्या विविध नियम व अटी -
शासनाने कोरोना लॉकडाऊन सवलतीत प्रार्थनास्थळे उघडण्याची परवानगी दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी आदेश जारी केले आहेत. सुरक्षित अंतर, मास्क वापरणे, ४० ते ६० सेकंदपर्यंत हात धुणे व सॅनिटायझरचा वापर करणे, यासह विविध नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत.
डिसेंबर २०१९ मध्ये देशात कोरोना महामारीला सुरुवात झाली आणि मार्चपासून सर्व धर्मिकस्थळे भक्तांसाठी बंद झाली. भाविकांनीही संयम दाखवत घरी राहूनच आपापल्या इष्ट देवतांची उपासना केली. आता बंद असलेल्या मंदिरे , मस्जिदी, चर्च, विहार, गुरूद्वारा आदी धार्मिक स्थळांचे दरवाजे भाविकांसाठी खुले होणार आहेत.
हेही वाचा-साईबाबांचे मंदिर दिवाळी पाडव्याच्या पहाटे दर्शनासाठी होणार खुले; भक्तांना पास अनिवार्य
हेही वाचा-दिवाळी पाडव्याला होणार विठूरायाचे मुखदर्शन; दररोज एक हजार भाविकांना लाभ