नांदेड - सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे कोरोनाच्या प्रार्दुभावातून लवकर बरे व्हावेत यासाठी गुजरात येथील कुबेरनाथ देवस्थान येथे तीन दिवसीय मृत्युंजय मंत्र व रुद्राभिषेक करण्यात येत आहे.
अशोक चव्हाण कोरोना मुक्त होण्यासाठी कुबेरनाथ येथे रुद्राभिषेक - अशोक चव्हाण कोरोना मुक्तीसाठी अभिषेक
अशोक चव्हाण कोरोना मुक्त व्हावेत यासाठी त्यांच्या समर्थकांनी गुजरात येथील श्री कुबेरनाथ देवस्थान येथे सतत तीन दिवस रुद्राभिषेक करण्याचे ठरवले आहे. ते या आजारातून लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली जात आहे.
कोरोना विषाणू मार्चमध्ये भारतात दाखल झाला, बघता बघता महाराष्ट्रामध्ये या विषाणूने थैमान घातले. संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. देशासह राज्यभरात हजारो नागरिककोरोनाच्या विळख्यात सापडले असून यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंबई येथे बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गेलेले चव्हाण, परत नांदेडला आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. ते मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.
अशोक चव्हाण यांचे समर्थक सुभाष देशमुख चिकाळेकर व त्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने अशोक चव्हाण कोरोनाच्या प्रभावातून लवकर बरे व्हावे, यासाठी गुजरात येथील श्री कुबेरनाथ देवस्थान येथे सतत तीन दिवस रुद्राभिषेक, मृत्यूंजय मंत्र, अभिषेक, गुळाचे पाणी, सरसोचे तेल व काळे तिळाचा अभिषेक कुबेर भंडारी देवस्थान कर्नाली येथील पंडीत गुरुजी शांति भाई जोशी, तुषार भाई शास्त्री, अर्पितभाई शास्त्री, मनोजभाई शास्त्री, हार्दिक भाई शास्त्री, तुषार भाई व्यास यांच्या हस्ते पार पडत आहे.