नांदेड - सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. भारतासह अनेक देशांनी कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. भारतात तर तब्बल तीन वेळा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे, तर अनेक जण यामुळे घरापासून दुरावले गेले आहेत. काही जण आपल्या नातेवाईकाकडे दोन महिन्यांपासून अडकून पडलेले आहेत. अशीच परिस्थिती पुणे येथील संतोष उपासे यांची झाली आहे. त्यांची अडीच वर्षाची मुलगी मागील दोन महिन्यांपासून आईपासून लांब आहे.
संतोष उपासे हे आपल्या पत्नीसह तीन महिन्यांपूर्वी नायगाव येथील मावशीकडे काही कामानिमित्त आले होते. पत्नी कांचन या लॉकडाऊन घोषित होण्यापूर्वी पुण्याला परत गेल्या. पण संतोष उपासे व ज्ञानेश्वरी हे दोघेही मावशीकडेच थांबले. यातच लॉकडाऊन जाहीर झाला आणि दोघेही नायगाव येथेच अडकून पडले. ते दोघेही जवळपास दोन महिने नायगावमध्ये अडकले. या काळात ज्ञानेश्वरीने आईकडे जाण्याचा अनेकदा हट्ट केला. पण संतोषला लॉकडाऊनमुळे पुण्याला परत जाता येत नव्हते.