नांदेड - राज्यात कोरोनाचे संकट आल्याने जिल्ह्यांच्या आणि विविध विभागांच्या निधीला कात्री बसली आहे. आहे त्या निधीमध्ये पुरेशी कामे होणार नाहीत. त्यामळे मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खाजगी गुंतवणुकीतून दीड ते दोन लाख कोटी रुपये मिळवण्याची परवानगी मागितली आहे. त्यांनी परवानगी दिल्यास येत्या तीन वर्षांत राज्यातील रस्ते चकाचक केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड येथील एका कार्यक्रमात बोलताना केले. गोदातीर समाचारच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त बोधचिन्हाच्या अनावरण समारंभात ते बोलत होते.
नांदेडमधील कार्यक्रमात बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण सर्वच खड्डयांचे खापर राज्याच्या बांधकाम विभागावर का?
मागच्या सरकारने पाच वर्षात केलेले खड्डे मोजण्यातच आमचा एक वर्षाचा कालावधी गेला. आताही असलेले सर्वच्या सर्व खड्डे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहीत. अनेक रस्ते राष्ट्रीय महामार्गात गेल्यानंतर त्यांच्या ठेकेदाराकडून कामास केलेल्या विलंबामुळे झाले आहेत. याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली असून आता कामाला वेग येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नांदेड शहरातील रस्त्यांसाठी 300 कोटी रुपये -
नांदेडच्या जिल्हा रूग्णालयाची इमारत उभारण्यासाठी कोणीच लक्ष दिले नव्हते. नवीन इमारत उभारून ती सुरू केली. नांदेडमध्ये लवकरच नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. शहराच्या सभोवताली असलेल्या २२ रस्त्यांसाठी ३०० कोटी रूपयांचा निधी देणार असल्याची घोषणा अशोक चव्हाण यांनी केली आहे.
तळे राखतो तो पाणी चाखतोच -
जो तळे राखतो तो पाणी चाखतच असतो. माझ्या खात्यासाठी वर्षभरात १.८१ लाख कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून नांदेडची कामे असली की, मी लगेच सही करतो. पुणे, बारामती, कोकणाला निधी मिळतच आहे. मात्र, नांदेडलाही मिळाला पाहिजे, अशी भूमीका आपण सरकारमध्ये घेत असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. माहूर तीर्थक्षेत्र विकासासाठी खासदार हेमंत पाटील व नितीन गडकरी यांना सोबत घेऊन प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाबद्दल खासदार पाटील यांच्याकडून नाराजी -
खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या भाषणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. तेलंगणातून नांदेडला येताना नांदेड जिल्हा लागला की वाहनात बसलेल्या प्रवाशांना खड्ड्यांमुळे लगेच जाग येते. सगळ्या दिशेने हीच परिस्थिती आहे. जिल्ह्यात अनेक कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. गोदावरी शुद्धीकरणासाठी माजी पर्यावरणमंत्री व नांदेडचे तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी दिलेल्या निधीतून अद्याप काम झाले नाही. या सर्व बाबींकडे चव्हाण यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले.
निवडक पत्रकारांचा सत्कार -
यावेळी बोधचिन्हाचे अनावरण, विशेषांकाचे व दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले प्रास्ताविक व आभार केशव घोणसे पाटील यांनी मानले. या प्रसंगी दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे यांच्यासह काही निवडक पत्रकार व संपादकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी मंत्री डी.पी. सावंत, महापौर मोहीनी येवनकर, हरिहरराव भोसीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.