नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यांना युनिट क्रमांक चार शंकर वाघलवाडा कारखाना विक्री करून आलेल्या रकमेतून अगोदर भाऊराव सहकारी साखर कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांची देणी द्यावेत. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे आग्रह धरावा अशी अपेक्षा प्रल्हाद इंगोले यांनी व्यक्त केली.
शंकर वाघलवाडा विक्रीच्या पैशातून अगोदर शेतकऱ्यांची देणी द्या - प्रल्हाद इंगोले
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीतून येणाऱ्या पैशातून शेतकऱ्यांची देणी द्यावीत. अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल त्यामुळे आतातरी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या थकित पैशाचा सहानुभूतीने विचार करून शंकर वाघलवाडा विक्रीतून आलेल्या रकमेतून शेतकऱ्यांची थकीत देणे द्यावेत अशी मागणी शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे दोन युनिट विकण्याची वेळ कारखाना प्रशासनावर आली. यापैकी पूर्वीचा शंकर वाघलवाडा कारखाना विक्रीची प्रक्रिया पार पडली असून उमरी तालुक्यातील दूरदृष्टी असणारे युवा उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या उद्योग समूहाने हा कारखाना 51 कोटी रुपयात विकत घेतला. शंकर वाघलवाडा विक्रीतून आलेले 51 कोटी रुपये इतर कर्ज फेडण्याच्या नावाखाली कारखाना प्रशासन हे पैसे इतरत्र वळवणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्याचा पुन्हा विश्वासघात होण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनीही आपल्या थकीत पैशासंदर्भात प्रशासनाकडे आग्रह धरावा. कारखान्याच्या स्थापनेपासून कर्ज नील करणे, कारखान्याचा विस्तार करणे अशा अनेक सबबी देऊन प्रशासनाने शेतकऱ्यांना नेहमीच कमी भाव दिला.
सन 2013-14 पासून कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे देणे आहे. कारखाना विक्रीतून आलेल्या पैशातून तरी आता शेतकऱ्यांची देणी द्यावीत. अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, कारखान्याच्या स्थापनेपासून शेतकऱ्यांनी नामदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर डोळे झाकून विश्वास ठेवला. त्यांच्या प्रत्येक कृतीचे समर्थन केले पण शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलं नाही. त्यामुळे आतातरी पालकमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या थकित पैशाचा सहानुभूतीने विचार करून शंकर वाघलवाडा विक्रीतून आलेल्या रकमेतून शेतकऱ्यांची थकीत देणे द्यावेत अशी मागणी शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे.