महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजकीय नेत्यांनी खेळाचे राजकारण करू नये - खासदार हेमंत पाटील - नांदेड

नांदेड येथे जिल्हा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन सभागृहात मागील तीन दिवसांपासून ३७वी सब-ज्युनिअर रिंगटेनिस स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेच्या समारोप व बक्षिस वितरण सोहळ्याला खासदार हेमंत पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी खेळाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विजेत्या संघांबरोबर खा. हेमंत पाटील

By

Published : Jul 30, 2019, 5:35 PM IST

नांदेड - राजकीय नेत्यांनी खेळ आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घेऊन खेळाचे राजकारण करू नये. गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहित करावे. खेळ हा निव्वळ खेळ असला पाहिजे, असे स्पष्ट मत खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.


नांदेड येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन सभागृहात मागील तीन दिवसांपासून चालू असलेल्या ३७व्या सब-ज्युनिअर रिंगटेनिस स्पर्धेचा समारोप व बक्षिस वितरण सोहळा खासदार हेमंत पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते.


पुढे ते म्हणाले, की भारतामध्ये गल्ली पासून दिल्ली पर्यंत खेळाचे राजकारण केले जाते. त्यामुळे गुणवत्ता असलेले खेळाडू जगासमोर येत नाहीत. ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये देशाची पाहिजे तशी कामगिरी होत नाही. यासाठी खेळाडूंना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा व त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडू खेळापासून वंचित राहतात. याउलट राजकारणामुळे खेळाला राजाश्रय मिळून आर्थिक बळकटी मिळायला हवी. तरच रिंगटेनिस सारखे काळाच्या ओघात मागे पडत चाललेले खेळ जगासमोर येतील. सध्याच्या संगणक व मोबाईलच्या युगात मुले मैदानी खेळ विसरून जात आहेत. मोबाईल गेम, व्हिडिओ गेम खेळण्यात दंग आहेत. यासाठी पालकांनी सजग राहून आपल्या मुलांमध्ये मैदानी खेळाबद्दल चेतना जागृत करायला हवी. रिंगटेनिस या क्रीडा प्रकाराबद्दल मुख्यमंत्री व क्रीडामंत्र्यांशी चर्चा करून शासकीय सोयी सवलती उपलब्ध करून देण्याबद्दल चर्चा करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या स्पर्धेत महिलांमध्ये नागपूर ग्रामीण व पुरूषांमध्ये नंदुरबारच्या संघाने बाजी मारली. तर पुरूष द्वितीय (नागपूर ग्रामीण), तृतीय (नाशिक), चतुर्थ (पुणे), महिला द्वितीय (मुंबई उपनगर), तृतीय (भंडारा), चतुर्थ क्रमांक (पिंपरी चिंचवड) या संघांनी यश मिळविले. तसेच वैयक्तिक स्वरूपातही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.विजेत्या संघाना व खेळाडूंना खासदार हेमंत पाटील व मान्यवरांच्या हस्ते चषक, सुवर्णपदक, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याच स्पर्धेमधून पॉण्डिचेरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय रिंगटेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला. यामध्ये नांदेडचा प्रणव सूर्यवंशी व निकिता केंद्रे यांची निवड करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details