नांदेड - जिल्ह्यातील विविध ४० ठिकाणी चेक पॉईन्ट उभारले असून सर्वत्र बॅरिगेट्स लावण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली आहे. अत्यावश्यक वाहनांना सर्वत्र मुभा असून अन्य ट्रक, मालवाहतूकीच्या वाहनांची पूर्ण तपासणी होणार असल्याचे ते म्हणाले. इतर कोणत्याही वाहनांना शहराच्या बाहेर अथवा शहरात येता येणार नसल्याची माहिती त्यांनी दिलीय.
अधीक्षक विजयकुमार यांनी सुरक्षेच्या दृष्टीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये त्यांनी हातावर शिक्के असलेल्या व्यक्तींना घरी राहण्याचे आवाहन केले. तसेच होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती बाहेर फिरताना दिसल्यास त्यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात येईल असे सांगितले. अशा व्यक्तींवर पोलीस प्रशासनाचे लक्ष्य असणार आहे. सध्या जिल्ह्यात अश्या दोन केसेस आढळल्या आहेत. त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने गुन्हे दाखल करण्यात आले असून अशा लोकांपासून सावधान राहण्याचे आवाहन विजयकुमार यांनी केले आहे.