नांदेड - शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीदरम्यान समाजकंटकांकडून अनुचित प्रकार घडू नये. यासाठी शहर आणि जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही आणि ड्रोनचे लक्ष राहणार असून स्वत: पोलीस अधिक्षक संजय जाधव आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांची नजर राहणार आहे.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहाने साजरी होणार आहे. शहरात सर्वत्र मुख्य चौक आणि रस्त्यावर महाराजांचे कटआऊट लावून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. या दरम्यान काही समाजकंटक मिरवणुकीत घुसून कायदा आणि सुव्यवस्था बाधीत करू शकतात. त्यामुळे अशा प्रवृतीवर लक्ष केंद्रीत करून त्यांचे डाव उधळून लावण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात आले असून प्रत्येकाची हालचाल टिपण्यासाठी ड्रोन कॅमेरे घिरट्या घालणार आहे.