महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरात लपून सुरू असलेल्या लग्नाचा 'डाव' पोलिसांनी उधळला, वधू-वरासह सात जणांवर गुन्हा - मुखेड नगरपरिषद

मुखेड नगरपरिषदेच्या पाठीमागे लपून लग्न लावत असल्याची माहिती मुखेड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी हा डाव उधळत वधू - वरासह सात जणांवर रविवारी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Nanded
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Apr 20, 2020, 10:07 AM IST

नांदेड- देशभरात कोरोना संसर्गामुळे संचारबंदी लागू असूनही मुखेड शहरात विनापरवाना लग्न लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी हा डाव उधळत वधू - वरासह सात जणांवर रविवारी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.


शहरातील मुखेड नगरपरिषदेच्या पाठिमागे लपून लग्न लावत असल्याची माहिती मुखेड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. यावेळी शासनाकडून कसल्याच प्रकारची परवानगी न घेता काही नातेवाईक एकत्र येऊन घरच्या घरी लग्न लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले.

यात 22 वर्षीय नवरदेव, वीस वर्षीय नवरी, त्या दोघांचेही आई-वडील, मामा-मावशी अशा सात जणांना पोलिसांनी चौकशी करुन ताब्यात घेतले. २२ वर्षीय नवरदेव हा ख्जावा बाबानगर देगलूर येथील रहिवासी आहे. तर नवरी शारदा नगर नांदेड येथील आहे. मुखेड नगर पालिकेच्या पाठिमागे घरातल्या-घरात लग्न लावत असल्याचे पोलिसांना सांगितले.


मुखेड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक गणपती चित्ते यांच्या तक्रारीवरुन जिल्हाधिकारी यांचे संचारबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात जणावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक नरसिंग आकूसकर व उपनिरीक्षक गणपती चित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्यंकट जाधव हे करत आहेत. देशावर कोरानासारखे एवढे मोठे संकट असताना अनेकांना यांचे गांभीर्य राहिलेले नाही, असे यावरुन दिसून येते. संचारबंदी असल्याने कोराना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी देशातील पोलीस यंत्रणा, डॉक्टर्स, सफाई कामगार, प्रशासन काम करत असताना हा प्रकार घडणे म्हणजे कोरानाला आमंत्रण देणेच असल्याचे दिसून येते.

ABOUT THE AUTHOR

...view details