नांदेड - कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने शहरातील शिवाजीनगर, नवी आबादी या मार्गावरील मशिदीसमोर बॅरिकेटची भिंत उभारली आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून उभारलेल्या या भिंतीमुळे २ समाजात काही अंशी असलेल्या तणावाला खतपाणी मिळत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार मागील ३ वर्षापासून साततत्याने सुरू आहे. राम नवमीच्या वेळी उभारण्यात येत असलेल्या या भिंतीमुळे नांदेड शहर वासियांना हिंदु-मुस्लीम असल्याची जाणीव होत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
'भैया ये दीवार टुटती क्यो नही'; पोलिसांनी उभारलेल्या भिंतीमुळे २ समाजात तणाव - nanded
खबरदारीचा उपाय म्हणून उभारलेल्या या भिंतीमुळे २ समाजात काही अंशी असलेल्या तणावाला खतपाणी मिळत असल्याचे दिसून येत आहे.
मागील दोन ते तीन वर्षांपासून देशात एक वेगळेच चित्र निर्माण होऊ लागले आहे. प्रत्येक समाज आपला धर्म उजागर करत सण उत्सवाच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करू लागला आहे. पूर्वी हजारोंच्या संख्येने निघणार्या मिरवणुका आता लाखोंच्या संख्येने निघत असून कुठलाही समाज असो केवळ शक्ती प्रदर्शन करण्यात व्यस्त आहे. अशीच परिस्थिती मागील जवळपास ३ वर्षांपासून नांदेड शहरात सुरू आहे. ३ वर्षापूर्वी काढण्यात आलेल्या राम नवमी मिरवणुकीदरम्यान किरकोळ प्रकार घडला होता. या प्रकाराचे भांडवल करत पोलीस प्रशासनाने शहरातील नवी आबादी परिसरात असलेल्या मशिदीसमोर बॅरीकेटची भिंत उभारण्यास सुरू केली. ती परंपरा आजही कायम आहे.
दोन दिवसांपासून ही भिंत उभारण्याचे काम सुरू आहे. रस्त्याने ये-जा करणारा प्रत्येक नागरिक या भिंतीकडे कुतुहलाने पाहत असून या भिंतीची गरजच काय, असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत. शनिवारी सकाळपासून या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बांधण्यात आलेली ही भिंत संरक्षण नव्हे तर २ समाजामध्ये तणावाची ठिणगी पाडण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.