नांदेड - जिल्ह्यातील आंबुलगा येथील बीट जमादार देविदास वाघमारे यांना २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या पथकाने कंधार पोलीस ठाण्यात ही कारवाई केली. यामुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
जुन्या भांडणाचा राग, तक्रारदाराला मागितली लाच; बीट जमादारच एसीबीच्या जाळ्यात - नांदेड
नांदेडमध्ये जुन्या भांडणाच्या रागातून तक्रारदाराला लाच मागितल्याचे प्रकरण बीट जमादाराला चांगलेच भोवले आहे.
टोकवाडीतील महावितरणच्या वीज खांबाची तोडफोड झाली होती. हा पोल तक्रारदाराच्या घराच्या दारात होता. त्यामुळे हा पोल तूच तोडलास, तुझ्या विरोधात गुन्हा दाखल करतो, अशी धमकी बीट जमादार देविदास वाघमारे देत होते. त्यानंतर याच तक्रारदाराच्या पत्नीचे गावातील एका महिलेसोबत भांडण झाले होते. भांडणाची तक्रार कंधार पोलीस ठाण्यात देण्यात आली. मात्र, तक्रारदाराला मदत करण्यासाठी जमादार वाघमारे २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करीत होते. याबाबतची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून वाघमारे यांना रंगेहाथ अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाटकर, पोलीस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.