नांदेड - कोरोनावर जगभरात संशोधन सुरू असले तरी, अद्याप लस शोधण्यात यश आलेले नाही. परंतु, प्लाझ्मा थेरपीचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. ही थेरपी आता नांदेडमध्येही उपलब्ध झाली आहे. विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या दोघांनी प्लाझ्मा दान केला आहे.
एका प्लाझ्मातून दोन रुग्णांना जीवदान मिळू शकते. संपूर्ण जगात कोरोनावर लसीसाठी संशोधन सुरू आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्चही करण्यात येत आहे. परंतु, आतापर्यंत कोरोनावर खात्रीशीर लस किंवा औषध मिळाले नाही. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून रुग्ण संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढते आहे. त्यात प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार हे बऱ्याच प्रमाणात यशस्वी होत असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. ही उपचारपद्धती अधिक खर्चिक आहे. मात्र, आता ही उपचारपद्धती नांदेडातील सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाली आहे. ही उपचारपद्धती उपलब्ध होताच कोरोनामुक्त झालेल्या दोघांनी शासकीय रुग्णालयात आपला प्लाझ्मा दान केला आहे.
आणखी आठ ते दहा जणांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. गरजेनुसार त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी बोलाविण्यात येणार आहे. एका प्लाझ्मामुळे कोरोनाच्या अत्यवस्थ अशा दोन रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.