नांदेड ( हदगाव ):कुसळवाडी हे १,३०० लोकसंख्या असलेले गाव चहूबाजूंनी डोंगरदऱ्यांनी वेढलेले एक निसर्गरम्य गाव आहे. या ठिकाणी ६०० मतदार असून, हे १०० टक्के आदिवासी खेडे आहे. आदिवासी गाव असूनही या गावात शैक्षणिक वातावरण आहे. गावात विविध क्षेत्रातील जवळपास ४० कर्मचारी आहेत. यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, पोलिस, डॉक्टर, वकील, प्राध्यापक आदींचा समावेश आहे. कुसळवाडी गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचवीपर्यंत आहे. याच शाळेने २०१४ मध्ये नांदेड जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा होण्याचा बहुमान शिक्षक, पालक यांच्या सहकार्याने मिळवला होता. त्यामुळे तत्कालीन सीईओ अभिमन्यू काळे यांनी कुसळवाडी गावाचे व शाळेचे कौतुक केले.
मोबाईल घेऊन डोंगरावर जावे लागते: कोरोना काळात १०० टक्के लसीकरण करून हदगाव तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहेे. सीईओ वर्षा ठाकूर यांच्या हस्ते हदगाव येथे गौरव झाला. परंतु कॉल करायचा झाल्यास डोंगरावर जावे लागते. कधी कधी शेजारील गावाच्या २ किलो मीटर शिवारात जाऊन कॉल करावा लागतो. गावात नेटवर्क नसल्यामुळे चोरंबा येथून ३ किलो मीटर दूरवरून रेशन डोक्यावर घेऊन यावे लागते. मोबाइल नेटवर्क आल्यास अनेक कामे सोपी होऊ शकतील. सर्वात मोठी समस्या म्हणजे या ठिकाणी कोणत्याही कंपनीचे नेटवर्क नसल्यामुळे येथील ग्रामस्थ, तरुण, विद्यार्थी यांचा बाहेरील जगात संपर्क होत नाही. नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाइन कामे, दूरध्वनी संभाषण, शासनाच्या विविध योजना राबवताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे.