नांदेड - नांदेड कृषी उत्पन्न बाजार समीती ही हळदीसाठी प्रसिद्ध आहे. पण, गेल्या काही वर्षांपासून काही खरेदीदार लिलावात माल न घेता खासगीत घेत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भाव मिळत होता व मार्केटची फीसही बुडत होती. परिणामी नांदेडच्या मार्केटमधील हळदीची आवक कमी होत होती. शेतकऱ्यांचा कोणताही माल खासगीत विकण्यापेक्षा चार खरेदीदाराच्या समोर लिलावात विकला. घेणाऱ्यामध्ये स्पर्धा होऊन शेतमालाची योग्य किंमत केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळतात. हळद किंवा अन्य शेतमाल एखाद्या खरेदीराकडे विक्रीसाठी घेऊन गेल्यास तो भाव पाडून कमी दरात घेतो. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर बाजार समिती प्रशासन आडते खरेदीदार यांची संयुक्त बैठक होऊन कोणत्याही खरेदीदारांनी थेट माल घ्यायचा नाही. हळद घेऊन आलेली वाहने मार्केट कमिटीच्या मैदानात उभी करून जाहीर लिलावाद्वारेच त्याची खरेदी करावी, असा निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांनी हळद लिलावात विकावी - प्रल्हाद इंगोले
हळदीसह सोयाबीन, हरभरा, तूर आदी शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी खुल्या सौद्याने न विकता शेतकऱ्यांनी हळद लिलावातच विक्री करावी, असे आवाहन शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी शेतकऱ्यांना केली आहे. नांदेड मार्केट कमिटीने खुले सौदे बंद करून डायरेक्ट आलेल्या हळदीसाठी लिलाव सुरू केले. या निर्णयाचे स्वागत करून यामुळे मार्केट कमिटी व शेतकरी दोघांचाही फायदा होणार असल्याचे इंगोले यांनी सांगितले.