नांदेड :नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नूरी चौक, माळटेकडी परिसरात मित्रांची दारू पार्टी सुरू होती. यावेळी आरोपी संतोष लक्ष्मण कर्नेवार आणि त्याचा मित्र शेख इरफान शेख गुड्डू यांच्यात खाण्यापिण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यातूनच संतोष कर्नेवार याने गावठी कट्ट्यातून फायरिंग केली. यावेळी शेख इरफान शेख गुड्डू ( वय २५ ) रा. मगदूमनगर, नई आबादी नांदेड हा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेख इरफान याच्या पोटाजवळ गोळी लागल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांकडून तपास सुरू :घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक भरणे, पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर भुरे, विमानतळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्धकाकडे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक बिरकुले आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे माने, पोलीस उपनिरीक्षक दत्ता काळे गंगाधर कदम, गणेश धुमाळ, तानाजी येळगे आणि त्यांच्या टीमने भेट देवून पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील नागरिकांकडून घटनेची माहिती घेतली जात आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे पथक नुरी चौक परिसरातच होते.
आरोपी अन् जखमीची गुन्हेगारी पार्श्वभूमी : नांदेड शहरातील गोळीबाराच्या घटना पोलिसांसमोर आव्हान निर्माण करणाऱ्या ठरत आहेत. अनेकांकडे गावठी पिस्टल आढळून येत आहेत. इतवारा परिसरात काही दिवसांपूर्वीच गोळीबाराच्या दोन घटना घडल्या होत्या. त्या घटना ताज्या असतानाच आता विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.