महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यातील विविध मतदारसंघात 'मनधरणी' काउंटडाऊन सुरू - नांदेडमध्ये सध्या मनधरणीचे काउंटडाऊन सुरू

युती अथवा आघाडीत जागा न सुटल्याने, निवडून येण्याची क्षमता असतानाही तिकीट नाकारलेल्या आणि नांदेड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी केलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आता नांदेडमध्ये सध्या मनधरणीचे काउंटडाऊन सुरू आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

By

Published : Oct 6, 2019, 8:39 AM IST

नांदेड -जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात अधिकृत उमेदवारांच्या विरोधात पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करून डोकेदुखी वाढविली आहे. युतीत जागा न सुटल्याने, निवडून येण्याची क्षमता असतानाही पक्षाने तिकीट नाकारले, अशा अनेक कारणांवरून इच्छुक उमेदवारांनी विविध मतदारसंघात अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी केलीआहे. त्यामुळे आता छाननीनंतर नांदेडमध्ये सध्या मनधरणीचे काउंटडाऊन सुरू आहे.

हेही वाचा... विधानसभा निवडणूक 2019 : 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज ठरले वैध, आता लक्ष माघारीकडे

शिवसेनेला सुटलेल्या सहा पैकी देगलूर वगळता इतर पाच मतदारसंघात भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी तर हदगाव व नांदेड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरूद्ध काँग्रेसच्याच इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे पुढचे दोन दिवस या बंडखोरांचा शोध घेऊन त्यांची मनधरणी करण्याची वेळ पक्षाच्या उमेदवारांवर आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

हेही वाचा... MAHA VIDHAN SABHA : आघाडीची सत्ता संपुष्टात.. युतीचे 'कमबॅक', लाखोंचे 'मराठा' मार्चे अन् भीमा-कोरेगाव दंगल

हदगावमध्ये माधवराव जवळगावकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले राजीव सातव समर्थक गंगाधर पाटील चाभरेकर यांनी तसेच शिवसेनेने नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिल्यामुळे बाबूराव कदम या दोन प्रमुख उमेदवारांनी बंडखोरीचे अस्त्र उगारले आहे. जवळगावकर यांना काँग्रेसने बी-फॉर्म देताना पर्यायी उमेदवारी म्हणून छायाताई पंजाबराव जवळगावकर यांचे नाव दिल्यामुळे त्यांनीही अर्ज दाखल केला आहे. भाजपचे माधवराव देवसरकर यांनी अपक्ष तर वंचित आघाडीचे जाकेर चाऊस यांनी बहुजन समाज पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नांदेड दक्षिण मतदारसंघात काँग्रेस व शिवसेनेला स्वपक्षीयांनीच नव्हे तर मित्रपक्षाच्या इच्छुकांनीही घेरले आहे. काँग्रेसने मोहन हंबर्डे यांना अनपेक्षितपणे उमेदवारी दिल्यामुळे माजी उपमहापौर व काँग्रेसचे नगरसेवक विनय गिरडे, राष्ट्रवादीचे जीवन घोगरे पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेच्या सौ. राजर्षी पाटील यांच्याविरूद्ध भाजपचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते तसेच शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे व बालाजी पुयड हेही बंडखोरांच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरले आहे. काँग्रेसचे नगरसेवक साबेर चाऊस यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन एमआयएम पक्षाची उमेदवारी स्वीकारली असल्याने ही देखील काँग्रेससमोर एक डोकेदुखी बनली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

हेही वाचा... मुख्यमंत्र्यांचा नामांकन अर्ज वैध, आशिष देशमुखांची मागणी फेटाळली

नांदेड उत्तर मतदारसंघात काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण नसले तरी, शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांच्याविरूद्ध भाजपचे मिलिंद देशमुख व बंडू पावडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोहा मतदारसंघात नांदेड दक्षिणप्रमाणेच बंडखोरी झाली आहे. ही जागा शिवसेनेला सुटल्यानंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीत भाजपचे इच्छुक असलेले सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने येथील चुरस वाढली आहे.

भाजपचे तालुकाध्यक्ष शरद पवार व वंचित आघाडीत प्रवेश केलेले भाजपचे पंचायत समिती सदस्य शिवा नरंगले यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. किनवटमध्ये भीमराव केराम यांनी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामकडून उमेदवारी दाखल केल्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या संध्या राठोड, यादव जाधव, शिवसेनेचे ज्योतिबा खराटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. मुखेडमध्ये राष्ट्रवादीचे शिवाजीराव पाटील जाधव यांनी काँग्रेस उमेदवाराचे नाव जाहीर होण्यापूर्वीच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. भोकरमध्ये भाजपचे बापूसाहेब गोरठेकर यांच्याविरूद्ध शिवसेनेचे प्रल्हाद इंगोले व बाळासाहेब बारडकर या दोघांनीही बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. बिलोली व नायगाव मतदारसंघात अधिकृत उमेदवाराविरोधात कोणीही बंडखोरी केली नसल्यामुळे प्रमुख उमेदवार निश्चित आहेत. उर्वरित मतदारसंघात बंडखोरांना अर्ज मागे घेण्यासाठी अधिकृत उमेदवारांना पुढच्या ३६ तासांपर्यंत बरीच कसरत करावी लागणार असून त्यासाठी वाट्टेल ती 'किंमत' मोजण्याचीही तयारी काही 'सशक्त' उमेदवारांनी करून ठेवली आहे. या उमेदवारांच्या मनधरणी करण्यासाठी अधिकृत उमेदवार कामाला लागले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details