नांदेड- धर्माबाद येथील उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्यावर १२ नगरसेवकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. काही मोजक्याच नगरसेवकांना विश्वासात घेऊन बाकीच्या १२ नगरसेवकांना अवमानाची वागणूक देणे आणि अरेरावीची भाषा केल्याच्या कारणावरुन हा ठराव दाखल केला आहे.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष मनमानी करीत असल्याचे कारण पुढे करून विविध पक्षाचे १२ नगरसेवक एकत्र आले आहेत. येथील नगरपरिषदेची निवडणूक १८ डिसेंबर २०१६ रोजी झाली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे १०, काँग्रेस २, भाजप ४, अपक्ष ३ नगरसेवक निवडून आले आहेत. नगराध्यक्षाची निवडणूक थेट जनतेतून झाली. त्यामध्ये काँग्रेसच्या अफजल बेगम अब्दुल सत्तार निवडून आल्या होत्या. काही महिने सर्व नगरसेवकांनी मिळून पालिकेचा कारभार केला. परंतु, विकास कामातून मिळणाऱ्या लाभावरून नगरसेवकांमध्ये मतभेद निर्माण झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, भाजपा ४, काँग्रेस २, अपक्ष २ मिळून १२ नगरसेवक एकत्र आले. त्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा वाद विकोपाला गेला.
पालिकेत कोट्यवधींचा निधी असूनही शहरातील विकास कामे रखडली आहेत. १२ नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विकास कामे विषय पत्रिकेवर नसल्यामुळे सर्वसाधारण सभेतील सर्व विषयास आमचा विरोध असल्याचे सांगून सभात्याग केला होता. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागताच पुन्हा बारा नगरसेवकांनी बंड पुकारले. येथील मुख्याधिकारी, नगराध्यक्षा अफजल बेगम अब्दुल सत्तार यांच्याकडे १२ नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्यावर विविध आरोप करून गुरूवारी अविश्वास ठराव दाखल केला आहे.