नांदेड - कोरोना संक्रमण आणि उपचाराविषयी शासनाचे नवीन धोरण लवकरच जाहीर होणार आहे. यामध्ये कॉन्टेनमेंट झोनच्या कालावधीविषयी देखील नवीन नियमावली येण्याची शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी कॉन्टोनमेंट झोनमधील नागरिक अद्याप संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत अबचलनगर भागात कोरोनाबाधितांची संख्या कमी असल्याने या ठिकाणचा कॉन्टेनमेंट झोन शिथिल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. त्यामध्ये गुरुद्वारा तसेच अबचलनगर या भागांचा समावेश करण्याची मागणी होत आहे. या भागातील रहिवासी रवीन्द्रसिंघ मोदी यांनी याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना ईमेल केला आहे.
अबचलनगरमधील प्रतिबंधित क्षेत्र उठवण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र - containment zones in nanded
अबचलनगर भागात कोरोनाबाधितांची संख्या कमी असल्याने या ठिकाणचा कन्टेनमेंट झोन शिथिल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी या परिसरात एक वाहनचालक कोरोना संक्रमित आढळून आला. यानंतर हा भाग कन्टेनमेंट झोनमध्ये गेला. प्रत्यक्षात तो चालक पंजाबहून परतल्यावर अबचलनगरमध्ये वास्तव्यास आलाच नव्हता. त्यामुळे या क्षेत्रात संक्रमण झाले नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. मात्र, यानंतर कोरोना संक्रमणाच्या काही घटना समोर आल्याने अबचलनगरवरचा कालावधी १८ दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या दरम्यान अबचलनगरसह गुरुद्वारा भोवतालच्या अनेक वाहन चालकांना ताब्यात घेऊन चाचणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यातील जवळपास सर्वजण निगेटिव्ह असल्याचे आढळून आले. तसेच २२ एप्रिलला पॉझिटिव्ह रुग्ण देखील पूर्णपणे बरा होऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आलाय. तसेच अन्य काहीजणांच्या चाचण्या देखील निगेटिव्ह आल्या आहेत. गुरुद्वारा बोर्डात कार्यरत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांरी देखील निगेटिव्ह आहेत. त्यामुळे परिसर सुरक्षित असून या भागात दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्यासाठी अटी शिथिल कराव्या, अशी मागणी होत आहे.