नांदेड- जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात कर्जवाटपात राष्ट्रीयकृत बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकांनी हात आखडता घेतला आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ 5 टक्के तर महाराष्ट्र ग्रामीण बँकांनी केवळ 18 टक्केच कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना सावकाराकडे हात पसरण्याची वेळ आली आहे.
नांदेडमध्ये केवळ 19 टक्केच कर्ज वाटप नांदेड जिल्ह्यातील 67 हजार 497 शेतकऱ्यांना 385 कोटी 90 लाख रुपये (19.61 टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीक कर्जवाटपात आघाडीवर आहे. जिल्हा बँकेने उद्दिष्टाचा टप्पा पार केला असून , एकूण 50 हजार 361 शेतकऱ्यांना 200 कोटी 42 लाख रुपये पीककर्ज वाटप केले आहे. तर राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँका, खासगी बँका पीक कर्जवाटपात पिछाडीवर आहेत.
2019-20 च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना 1 हजार 967 कोटी 51 हजार रुपये एवढे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सोमवारपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी 1 हजार 360 कोटी 7 लाखांपैकी 6 हजार 724 शेतकऱ्यांना 71 कोटी 50 लाख रुपये (5.26 टक्के) कर्जवाटप केले. खासगी क्षेत्रातील बँकांनी 151 कोटी 67 लाखांपैकी 3 हजार 386 शेतकऱ्यांना 63 कोटी 1 लाख रुपये (41.54 क्के ) पीक कर्जवाटप केले आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 277 कोटी 17 लाखांपैकी 7 हजार 26 शेतकऱ्यांना 50 कोटी 97 लाख रुपये (18. 39 टक्के) पीक कर्जवाटप केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 178 कोटी 60 लाखांपैकी 50 हजार 361 शेतकऱ्यांना 200 कोटी 42 लाख (112.22 टक्के ), तर राष्ट्रीयीकृत बँकांची गती अतिशय संथ आहे. ग्रामीण बँकेचे कर्जवाटप 25 टक्के, तर खासगी बँकांचे पीक कर्जवाटप 50 टक्क्यांच्या आत आहे.
नांदेड जिल्ह्यातील बँक पीक कर्जवाटपाची टक्केवारी-
- राष्ट्रीयीकृत बँका- 5.26 टक्के
- खासगी बँका - 41 .54 टक्के
- म. ग्रा. बँक - 18.39 टक्के
- जिल्हा बँक- 112.22 टक्के