नांदेड - राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच मित्र पक्षांचे सरकार स्थापन होत आहे. मागचे पाच वर्षे विरोधी बाकावर बसलेल्या अशोक चव्हाणांच्या आणि नांदेडकरांच्या आशा यामुळे पल्लवीत झाल्या आहेत. अशोक चव्हाण यांच्याकडे कोणती जबाबदारी येणार याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
काँग्रेस पक्षाकडे उपमुखमंत्रीपद येईल असे सांगितले जात आहे. शिवाय महसूल आणि अन्य महत्वाची खाती येणार आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांना महसूल खाते मिळणार का याविषयी चर्चा सुरू आहे. पाच वर्षे सत्तेविना राहिलेल्या चव्हाण समर्थकांकडून मंत्रीपदाची अपेक्षा केली जात आहे. पण, या प्रश्नाचे उत्तर उद्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यावरच मिळेल.
हेही वाचा -आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री किती? आज होणार निर्णय - बाळासाहेब थोरात
नांदेड जिल्ह्यात नऊ पैकी काँग्रेसला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (भोकर), माधवराव पाटील जवळगावकर (हदगाव), रावसाहेब अंतापूरकर (देगलूर) आणि मोहन हंबर्डे (नांदेड दक्षिण) अशा चार जागा मिळाल्या आहेत. भाजपला डॉ. तुषार राठोड ( मुखेड), भीमराव केराम (किनवट) आणि राजेश पवार (नायगाव) अशा तीन तर शिवसेनेला बालाजी कल्याणकर (नांदेड – उत्तर) व शेकापला श्यामसुंदर शिंदे (लोहा) अशा प्रत्येकी एक जागा मिळाल्या आहेत.
हेही वाचा -तुम्ही बघत रहा 'बुलेट ट्रेन'पेक्षा वेगाने ३ चाकांची रिक्षा धावेल; सतेज पाटलांचा फडणवीसांना टोला
अशोक चव्हाण दोनदा मुख्यमंत्री राहिले असून त्यांना सर्वात जास्त अनुभव आहे. बाळासाहेब थोरात यांची गटनेतेपदी निवड झाली असून त्यांच्याकडे सध्या प्रदेशाध्यक्षपद आहे. आता उपमुख्यमंत्री म्हणून थोरात, अशोक चव्हाण की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यापैकी कोणाची निवड होणार? यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत.