महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये दुचाकी चोरांची टोळी जेरबंद, अल्पवयीन मुलामार्फत केली जायची चोरी - दुचाकी

शहरात दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झालेली असताना वजिराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दुचाकी चोरट्यांची टोळी पकडून वाहन धारकांना दिलासा दिला आहे.

नांदेडमध्ये दुचाकी चोरांची टोळी जेरबंद

By

Published : Jul 17, 2019, 10:40 AM IST

Updated : Jul 17, 2019, 12:07 PM IST

नांदेड - अल्पवयीन मुलामार्फत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात वजिराबाद पोलिसांना यश आले आहे. टोळीच्या म्होरक्यासह अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चोरी केलेल्या तब्बल १२ दुचाकी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.

शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना वजिराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दुचाकी चोरट्यांची टोळी पकडून वाहन धारकांना दिलासा दिला आहे.

शहर व परिसरात दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. महिन्याकाठी शहरातून किमान ४० दुचाकी चोरी झाल्याच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यात होत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सर्व ठाणेप्रमुखांची बैठक घेवून वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने वजिराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप शिवले यांनी डी. बी. पथकाला सक्रिय केले होते.

नांदेडमध्ये दुचाकी चोरांची टोळी जेरबंद

विधीसंघर्षग्रस्त बालकाला पुढे करून मास्टर चावीने दुचाकी चोरी करणारी मुखेड तालुक्यातील टोळी शहरात काही महिन्यांपासून सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विशेष शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रविण राठोड, पोहेकॉ दत्तराम जाधव, गजानन किडे, बबन बेडदे, संजय जाधव, शरदचंद्र चावरे, संतोष बेलुरोड, चंद्रकांत बिरादार, दिलीप राठोड, पुसरी, सुरेश लोणीकर यांच्या पथकाने या विधीसंघर्षग्रस्त बालकाचा छडा लावत त्यास सुगाव ता. मुखेड येथून ताब्यात घेतले. चौकशी केली असता, यातील आरोपी प्रफुल्ल भिसे (३५) हा मुखेड तालुक्यातील जवळा पाठक येथील असल्याची माहिती पथकाला मिळाली. परंतु पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच आरोपी मुंबईला पसार झाला. त्याचा शोध घेत पथक मुंबईत गेले असता तो मेट्रोचे काम करत असताना आढळून आला. त्याला ताब्यात घेतले असता त्याने प्रारंभी उडवाउडवी करणारी उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच नांदेड शहरातील भाग्यनगर, शिवाजीनगर, वजिराबाद ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलाला हाताशी धरुन दुचाकी चोरी केल्याचे त्याने कबूल केले.

शिवाय या गाड्या जिल्ह्यातच विकल्याची माहिती त्याने दिली आहे. चोरी केलेल्या दुचाकी सबंधितांकडून जप्त करण्यात आल्या असून त्यांच्याविरुद्ध वेगळा गुन्हा नोंद होणार आहे. दुचाकी चोरी प्रकरणात दुसरा आरोपी दिनेश सिद्धार्थ भिसे हाही सक्रिय असल्याची माहिती समोर आली. त्यालाही पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींना १६ जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना २० जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

तर वाहन चोरी करण्याऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकास न्यायालयाच्या आदेशानुसार बालसुधारगृहात पाठविण्यात येणार आहे. वाहन चोरी करणाऱ्या टोळीचे आंतरराज्यीय गुन्हेगारांशी सबंध आहेत का, आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येतात का, या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

Last Updated : Jul 17, 2019, 12:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details