नांदेड- कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांप्रकरणी अनेक आंदोलनानंतरही तोडगा न निघाल्याने अखेर महापालिकेचे कर्मचारी ३० जुलैपासून बेमुदत संपावर जात आहेत. सोमवारी झालेल्या धरणे आंदोलनानंतर ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. महापालिकेत कायम आणि कंत्राटी मजूर, वाहनचालकांसह सफाई कामगारांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत.
या मागण्यांच्या सोडवणुकीसाठी मनपा कामगार कर्मचारी युनियनतर्फे राज्यस्तरावर पाठपुरावा केला जात आहे. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिक स्तरावर कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रशासनाने पाच ते सहा बैठका घेतल्या. प्रशासनावर विश्वास ठेवून कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुढे ढकलले. मात्र कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक अद्यापही झाली नाही. त्यामुळे ३० जुलै पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉ.गणेश शिंगे यांनी सांगितले.