नांदेड- राज्यातील चार पालिकेतील पोटनिवडणुकीची घोषणा झाली असून लगेच आचारसंहिता लागू झाली आहे. यात नांदेडमधील प्रभाग क्रमांक 13 ड चा समावेश आहे. ही पोटनिवडणूक 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 14 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज प्रकिया सुरु होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे नगरसेवक साबेर चाऊस यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन एमआयएममध्ये प्रवेश केला आणि एमआयएमकडून नांदेड दक्षिण विधानसभा निवडणूकही लढविली. साबेर यांना 27 हजार मते मिळाली. साबेर यांच्या राजीनाम्यामुळे नांदेड मनपाच्या प्रभाग क्रमांक 13ड ची जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक केव्हा होणार याकडे लक्ष लागले असताना राज्यातील नांदेड प्रभाग क्रमांक 13 ड, जळगावमधील प्रभाग क्रमांक 9 अ, परभणीतील प्रभाग क्रमांक 14 अ व नगरमधील प्रभाग क्रमांक 6 अ मधील पोटनिवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक विभागाने सुरु केली आहे.
या चारही प्रभागात लगेच आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक निकालापर्यंत ती लागू राहील. या प्रभागातील मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती किंवा घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, मनपा पदाधिकारी यांनी करु नयेत. या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित प्रभागातील मतदार यादी तयार करण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे.