नांदेड- केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकाला विरोध करत शेतकऱ्यांचा कोरडा पुळका दाखविणाऱ्या पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन सहकारी साखर कारखाने का विकले? असा प्रश्न भाजपचे खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी केला आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारवर बिनबुडाचे आरोप करत शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, अशा कानपिचक्याही खासदार चिखलीकर यांनी दिल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील साखरसम्राट म्हणून आपणच या जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे तारणहार आहोत, असा देखावा निर्माण करत अशोक चव्हण यांनी भाऊराव चव्हाण साखर कारखाना, येळेगाव-देगावच्या अधिपत्याखाली वाघलवाडा येथील सहकारी साखर कारखाना चालविण्यासाठी विकत घेतला होता. शंकर सहकारी साखर कारखाना युनिट क्र.3 (भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट क्र.3) आणि हदगाव तालुक्यातील हडसणी हुत्माता जयंतवराव पाटील सहकारी साखर कारखाना युनिट क्र.4 (भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट क्र.4) अशा पध्दतीने हे दोन्ही कारखाने चालविण्यासाठी घेतले होते. या कारखान्यांतून चव्हाणांना नफा मिळाला तोपर्यंतच त्यांनी हे कारखाने चालविले. जिथे नफा नसतो तिथे चव्हाण काम करत नाहीत, यानुसार पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन्ही कारखाने विक्रीस काढले. ते कारखाने त्यांनी विकत घेतले होते. त्यावेळी नांदेड जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना केवळ आपणच न्याय देणार अशा आरोळ्या ठोकल्या होत्या. आता दोन्ही कारखाने विकून चव्हाणांनी ऊस उत्पादकांना वाऱ्यावर सोडले आहे. ऐवढेच नाही तर त्या कारखान्यातील कामगार, कर्मचारी यांनाही देशोधडीला लावले आहे. त्यामुळे चव्हाणांना शेतकऱ्यांच्या हिताची काळजी नाही तर कोरडा पुळका आहे, अशी कोपरखळीही चिखलीकर यांनी लगावली.
हेही वाचा -'महाकाम करणाऱ्या केंद्र सरकारने महामार्गावरील खड्डेही बुजवावेत'
काँग्रेसच्यावतीने शेतकरी आणि कामगार विधेयकाला विरोध करण्यासाठी काढण्यात आलेल्या बैलगाडी लाँग मार्चमध्ये चिखलीकर यांच्यावर जी टिका करण्यात आली ती टिका निव्वळ अज्ञानातून करण्यात आली आहे. वास्तविक नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन चिखलीकर यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. त्यावेळी पालकमंत्री कुठे होते? मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीने बेजार झाला असताना राज्यातील त्रिमुर्ती सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई का देत नाही? अशोक चव्हाण हे मंत्री मंडळातील जबाबदार मंत्री असताना त्यांनी विधानसभा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मावेजा मिळवून देण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत? असा प्रश्न उपस्थित करताना चिखलीकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे त्वरीत करून मदतीची मागणी केली होती. भारतीय जनता पक्ष सदैव शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. शेतकऱ्यांचे होणारे हित काँग्रेसला बघवत नाही. काँग्रेसकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे काँग्रेसने बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष द्यावे आणि कोरडा पुळका सोडून द्यावा, असेही खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर म्हणाले.
क्लब, मटके कोणाचे हे जनतेला माहीत आहे...!
नांदेड जिल्ह्यातील क्लब आणि मटके हे कोणाचे आहेत, हे अगोदर अशोक चव्हाणांनी तपासून पहावेत. त्यांच्या सानिध्यात वाढणाऱ्या चेले-चपाट्यांचे क्लब व मटका सर्वत्र सुरू आहेत. जमिनी हडप करणे, अवैध धंदे चालविणे हे त्यांच्याच चेले-चपाट्यांची प्रवृत्ती आहे. असे अवैध धंदे करण्याची आम्हाला गरज नाही. लोकसेवा हा आम्ही उचललेला वसा आहे. त्यामुळे जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. अशोक चव्हाणांनी कुठल्याही थरारला जावून कोणत्याही बिनबुडाचे आरोप केले तरी जनतेला खरे काय माहीत आहे, असेही खासदार चिखलीकर म्हणाले.
हेही वाचा -नांदेड : अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा; शेतकरी कायद्यावरून केंद्राचा निषेध