नांदेड Nanded Hospital Death Case : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरांवर काल रात्री सदोष मनुष्यवधास कारणीभूत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकीच्या मृत्यू प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून कामाजी टोंपे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिलीय. त्यांचे नातेवाईक रुग्णालयात भरती असताना त्यांना बाहेरुन ४० हजारांहून अधिकची औषध खरेदी करण्यास त्यांनी भाग पाडलं. तसंच रक्त व इतर तपासण्यासाठीही पैसेही खर्च करावे लागले. अधिष्ठाता डाॅ. एस आर वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर यांनी उपचाराकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलंय.
काय आहे महिला आणि बाळ मृत्यू प्रकरण :कुरुळा इथल्या महिलेला प्रसूतीसाठी नांदेड इथल्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र महिलेचं सिझल झाल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या दिवशी या बाळंत महिलेचाही मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यामुळे महिलेचे नातेवाईक असलेल्या कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता एस आर वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णालयातील मृत्यूसंख्या 41 वर :नांदेडच्या विष्णुपूरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात मागील 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. तसंच दुसऱ्या दिवशी 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. सलग तिसऱ्या दिवशी या रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरूच असून मागील 24 तासांत 6 रुग्णांचे मृत्यू झाल्याचं समोर आलंय. यात 2 नवजात बालक आणि 4 प्रौढ पुरूषांचा समावेश आहे. त्यामुळं एकूण मृत्यूसंख्या आता 41 वर पोहोचली असून गंभीर बाब म्हणजे यात तब्बल 22 बालकांचा समावेश आहे, तर अजूनही 25 हून अधिक बालकं अत्यवस्थ आहेत. सद्यस्थितीत या रुग्णालयात 823 रुग्ण भरती असल्याची माहिती वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून देण्यात आलीय.