नांदेड: शुभांगी हत्या प्रकरणाचा लिंबगावचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार या प्रकरणाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास करीत आहेत. शुभांगीचे प्रेम प्रकरण कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यामुळेच तिची सोयरीक करण्यात आली. परंतु प्रियकराच्या डोळ्यांत ही सोयरीक खुपत होती. त्याने नियोजित वराला आपल्या प्रेमसंबंधाची माहिती दिली. त्यामुळे शुभांगीची सोयरीक मोडली. गावात बदनामी झाल्याचा राग तिचे वडील जनार्दन जोगदंड आणि भावाला होता. त्यातूनच त्यांनी शुभांगीचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. २२ जानेवारी रोजी शुभांगीच्या आईला गावातीलच मामाकडे पाठविले. त्यानंतर रात्री शुभांगीचा गळा घोटण्यात आला. यावेळी शुभांगीची आई मामाकडे असल्याने तिला साधी कुणकुणही लागली नाही. काही वेळानंतर आरोपींनी शुभांगीचे प्रेत खताच्या पोत्यात भरून शेतात नेले. या ठिकाणी सरणही रचण्यात आले.
आईपासून घटना लपविण्याचा प्रयत्न: सरणाला अग्नी देण्यापूर्वी शुभांगीचा मामा तिच्या आईला घेऊन थेट शेतात पोहोचला. यावेळी शुभांगीच्या वडिलांनी विजेवरील शेगडी पेटवित असताना शॉक लागून शुभांगीचा मृत्यू झाल्याचे तिच्या आईला सांगितले. तसेच अंत्यदर्शन घेण्यासाठी तिच्या आईला फक्त शुभांगीचा चेहरा दाखविला. आरोपींनी शुभांगीचे प्रेत जाळल्यानंतर गावात उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. ही चर्चा शुभांगीच्या आईच्या कानावर पडू नये, म्हणून जनार्दन जोगदंड हे पत्नीला घेऊन शेतातच मुक्काम करीत होते. आपल्या लेकीचा पित्यानेच खून केल्याचा साधा संशयही शुभांगीच्या आईला आला नाही.