नांदेड -कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. निसर्गाचा लहरीपणा तर बळीराजाच्या पाचवीलाच पुजलेला आहे. मात्र, या सर्वावर मात करत बोरगाव येथील शेतकरी कल्याण पाटील यांनी पारंपरिक शेतीला बगल देत रेशीम शेतीला प्राधान्य दिले आहे. रेशीम कीटक संगोपणातून बोरगाव येथील शेतकरी कल्याण पाटील हे वर्षाकाठी एकरी पाच लाख रुपयाचे उत्पन्न घेतात.
चॉकी कीटक संगोपनातून एका एकरात वर्षाकाठी पाच लाखांचे उत्पन्न, नांदेड येथील शेतकऱ्याची गोष्ट एका एकरात तुती लागवड, १०×१० ची खोली आणि त्यापासून मिळणारे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये.! त्यांनी ही आर्थिक समृद्धीची किमया साधली आहे ती रेशीम उत्पादनातून. लोहा तालुक्यातील कल्याण पाटील हे व्यवसायाने शेतकरी, बोरगाव येथे स्वतःची 21 एकर शेती आहे. शेतीसाठी पाण्याची देखील सुविधा आहे. मात्र, कल्याण पाटील यांनी पारंपरिक पीक न घेता रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. १९९६ पासून ते रेशीम शेती करतात. त्या सोबतच रेशीम कोषासाठी लागणारे कीटक संगोपन देखील करतात.
कीटक संगोपणातून कल्याण पाटील वर्षाकाठी पाच लाख रुपये उत्पन्न काढतात. घरातील एका १०×१० च्या खोलीत हा व्यवसाय सुरू केला आहे. शंभर अंडीपुंजांच्या माध्यमातून चॉकी करण्यासाठी १२०० रुपये शेतकऱ्यांकडून घेतात. शेतकऱ्यांना अनुदानातून अंडीपुंज मिळतात. चालू वर्षात पाटील यांनी जुलै २०१९ पासून २०हजार अंडीपुंजांपासून चॉकी तयार करून विक्री केली आहे. पाटील यांना रेशीम शेतीचा २५ वर्षांचा अनुभव आहे. त्यांना आलेल्या अनुभवातून ते इतर शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन करतात. या प्रक्रियेत १०० अंडीपुंजांपासून चॉकी तयार करण्यासाठी सरासरी ७०० रुपये खर्च होतो. या प्रक्रियेसाठी साधारणतः २५ अंश सेल्सिअस तापमान आणि ८० ते ९० टक्के आर्द्रतेची गरज असते. तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी हिटर आणि इतर उपकरणाचा आधार घेतला जातो. पाटील यांच्या कीटक संगोपणामुळे कोष उत्पादक शेतकऱ्यांचा आठ दिवसाचा वेळ कमी लागत आहे.
कापूस, सोयाबीन, आणि इतर पिकांना चार महिन्यांचा कालावधी जातो. लागवडीपासून काढणीपर्यंत एकरी १५ ते २० हजार उत्पन्न मिळते. मात्र, रेशीम शेती करून एकरी पन्नास ते पंचावन्न हजार रुपये उत्पन्न मिळते. कमी पैसा आणि कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळत असल्याने बोरगावातील अनेक शेतकऱ्यांनी रेशीम शेती सुरू केली आहे. इतर पिकांपेक्षा तुती लागवडीतून कोष उत्पादन फायदेशीर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत रेशीम शेतीकडे वळण्याचे आवाहन वरिष्ठ तांत्रिक सहायक पी. बी. नरवाडे यांनी केले आहे.