नांदेड -तेलंगाणा राज्यात जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी 'जनता कर्फ्यु' लागू केला आहे. याअनुषंगाने ही बंदी घालण्यात आली आहे.
जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मोठया प्रमाणावर जीवित हानी होत आहे. कोरोना विषाणूबाधित रुग्ण आपल्या देशातील काही ठिकाणी आढळून आलेले आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. यामुळे नांदेड शहरातून तेलंगणा राज्यात जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांवर एका दिवसाची बंदी घातली आहे. तेलंगणाकडून रविवारी 22 मार्चच्या सकाळी सात वाजल्यापासून ते 23 मार्चच्या सकाळी सात वाजेपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी जिल्ह्यातून तेलंगणामध्ये जाणे-येणे टाळावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.