नांदेड- लोकसभेच्या १४ उमेदवाराचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाल्यानंतर नांदेडमध्ये नेमके कोण विजयी होणार याची आकडेमोड सुरू झाली आहे. गावागावात आकडेमोड केली जात असून गावातील पारावर आणि चावडीवर या चर्चेने आता चांगलाच रंग भरला आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय झाला आहे. काँग्रेसचे बालेकिल्ला राखण्यासाठी येथील उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सर्वतोपरी ताकद लावली. या गडाला भाजपने सुरुंग लावण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर यांच्या रूपाने एक तगडा उमेदवार रिंगणात उतरवून शह देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रा.यशपाल भिंगे यांनीही प्रचारात चांगलीच आघाडी घेऊन एक तिसरा पर्याय उभा केला होता.
निवडणुकीत चांगलाच रंग भरला. यावेळी गत निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाच्या टक्केवारीमध्ये पाच टक्क्यांच्या आसपास वाढ झाली आहे. त्यामुळे नांदेडचा खासदार कोण होणार याबाबत जनतेत उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्याच उत्सुकतेने आता गावातील कट्टयावर, वट्यावर पारावर, चावडीवर, नेमके कोण विजयी होणार याची आकडेमोड सुरू झाली. या मतदार संघातून, तालुक्यातून, गावातून इतके मतदान झाले. या पक्षाला इतकी लीड मिळाली आहे. या भागात या पक्षाला लीड मिळेल, त्या भागात त्या पक्षाला लीड मिळेल. अशा चर्चा चांगल्याच रंगत आहेत. कागदावर आकडेमोड करीत आपलाच पक्ष विजयी होईल. अशी आकडेमोड केलेली पोस्ट देखील व्हायरल केली जात आहे. २३ मे ला निवडणूकीचा निकाल लागणार असून एक महिन्याच्यावर कालावधी शिल्लक आहे. या एक महिन्याच्या पुढील काळात अनेक पैजा लागल्या तर ते नवल असणार नाही.