नांदेड - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून यावर्षी होणाऱ्या परीक्षाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या नव्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 13 सप्टेंबर, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ही परीक्षा 11 ऑक्टोबर तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. आयोगाच्या या निर्णयाचे आणि राज्य सरकारच्या तत्परतेचे महाराष्ट्र युवक काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस राज्यात मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. आता अखेर या परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहीर केले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एप्रिल-मे महिन्यात आयोजित केलेल्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. त्यातील तीन परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून या परीक्षा सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पार पडणार आहेत.
हेही वाचा...एमपीएससी परीक्षांच्या तारखा जाहीर, विद्यार्थी संघटनांकडून केंद्र बदलण्याची मागणी
राज्यभरात राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणार्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा मोठा विद्यार्थी वर्ग आहे. यात मुख्यत्वे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. कोरोनामुळे परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु, परीक्षा कधी होणार याविषयी अनिश्चितता निर्माण झाली होती. त्यातच केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांकडून झालेल्या परिक्षांचे निकाल जाहीर करुन आगामी राज्यसेवा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देण्यात आले होते.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते... मुख्यमंत्र्यांनी युवक काँग्रेसच्या वतीने दिलेल्या बालाजी गाढे यांच्या निवेदनाची दखल घेऊन मागण्या पूर्ण केल्या आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या आगामी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. आमच्या मागण्या मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि आयोगाचे आम्ही आभार मानतो, असे युवक काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाढे यांनी म्हटले आहे.